उमरगा : सध्या शेतकरी ई-पीक पाहणी नोंदविताना दिसत आहेत. मात्र, यामध्ये त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वेळा साईट बंद असतानाच पिकाचा फोटो अपलोड करताना अनेक अडचणीदेखील निर्माण होत आहेत. त्यामुळे गावोगावी कार्यशाळा घेऊन ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशा सूचना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी प्रभारी तहसीलदार एन. आर. मल्लूरवार यांना केल्या.
ई-पीक पाहणी व संजय गांधी निराधार योजनेसंदर्भात आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मंगळवारी प्रभारी तहसीलदार एन. आर. मल्लूरवार यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी नोंदविताना अपूर्ण माहितीमुळे अडचणी निर्माण होत आहेत. तसेच येत्या १५ सप्टेंबर रोजी याची मुदत संपणार असल्याने तात्काळ तलाठ्यांना गावोगावी कार्यशाळा घेऊन ई-पीक पाहणीबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. तसेच संजय गांधी निराधार योजनेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबत उपयोजना करणे व परवाच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे, आदींबाबत सूचना केल्या.