उस्मानाबाद : तक्रारदाराच्या भावजयीच्या नावे खरेदी केलेल्या शेत जमिनीची फेरफारला नोंद घेऊन तसा सातबारा देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले. ही कारवाई मंगळवारी दुपारी तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथे करण्यात आली.
तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील एका इसमाने त्याच्या भावजयीच्या नावे शेत जमीन खरेदी केली होती. खरेदी केलेल्या शेत जमिनीची फेरफारला नोंद घेऊन तो फेर मंडळ अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेत तसा सातबारा देण्यासाठी सिंदगाव सज्जाचे तलाठी गोपाळ किसनराव कोळी यांच्याकडे रीतसर अर्ज केला होता . अर्जदारांच्या या कामासाठी तलाठी कोळी यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात केली होती.
तक्रारदाराची तक्रार प्राप्त होताच पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक एस. आर. जिरगे, उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. व्ही.आर. बहिर यांनी तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर पोनि बी.जी. आघाव यांनी सिंदगाव येथील तलाठी सज्जा कार्यालयात मंगळवारी दुपारी सहकाऱयांसमवेत सापळा रचला. त्यावेळी तक्रारदाराच्या कामांसाठी तलाठी गोपाळ कोळी यांनी एक हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारल्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास व्ही.आर. बहिर हे करीत आहेत. एसीबीच्या या कारवाईने लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत.