उस्मानाबाद : मंत्रिपद नाकारल्यामुळे नाराज असलेले शिवसेने नेते आ. तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळेजिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाजप समर्थक सदस्या अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सेनेच्या बंडखोर गटाचे धनंजय सावंत यांची वर्णी लागली़जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे २६ पैकी १७ सदस्य हे आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठिशी राहिले. याशिवाय, भाजपचे ४, सेनेच्या बंडखोर गटाचे ७, काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी एक, असे ३० मतांचे गणित जिल्हा परिषदेत जुळून आले. भाजप नेते आ. राणाजगजितसिंह पाटील व आ. सुजितसिंह ठाकूर यांनी पुढाकार घेत हे समीकरण जुळवून आणले. आ. तानाजी सावंत यांचा सेनेतील समर्थक सदस्यांचा मोठा गट फुटून भाजपला मिळाला़ १० पैकी ७ सदस्य या बंडखोर गटात सामील झाले.याबदल्यात भाजपने सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना उपाध्यक्षपद बहाल केले. त्यामुळे महाविकास आघाडीला व पर्यायाने शिवसेनेलाच पराभव पहावा लागला आहे़ दरम्यान, मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असलेल्या सावंतांनी आपले उपद्रवमूल्य दाखविण्यासाठीच हा निर्णय घेतल्याची चर्चा असून, शिवसेनेतील पदाधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता करू लागले आहेत.
तानाजी सावंतांचा शिवसेनेला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:06 AM