उस्मानाबाद : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या आमदार तानाजी सावंत यांनी आपले उपद्रवमूल्य दाखवून देण्यास सुरुवात केली आहे. आज होत असलेल्या उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत सेनेतील सावंत गट फुटून भाजपला मिळाल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले. सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांना भाजपने उपाध्यक्ष पदासाठी समर्थन दिल्याचे दिसून येत आहे. याबदल्यात भाजप समर्थक सदस्य सावंतांना मदत करण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची आज निवड होणार आहे. भाजपला धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने कालच एकत्र येण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. मात्र पहाटेपर्यंत फॉर्म्युला ठरला नव्हता. याचदरम्यान, आ तानाजी सावंत यांच्या समर्थक सदस्यांचा एक गट महाविकास आघाडीतून फुटून भाजपसोबत गेला. अर्ज भरण्यासाठी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत हे सकाळी भाजप नेत्यांसह जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला असून, अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे यांनी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी सेनेच्या अंजली शेरखाने तर उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे प्रकाश आष्टे यांनी अर्ज दाखल केला आहे. एकंदर फाटाफूट पाहता सद्यस्थितीत भाजपचे पारडे जड दिसून येत आहे.
तानाजी सावंतांना शिवसेनेचा 'जय महाराष्ट्र', उद्धव ठाकरेंसोबत उडाले खटके?
तानाजी सावंत यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याने त्यांनी नाराजी दर्शवली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तानाजी सावंत यांच्यात चर्चाही झाली होती. पण, त्यावेळी सावंत यांनी थेट पक्षप्रमुखांनाच उत्तर दिलं, अशा बातम्या माध्यमांमध्ये रंगल्या होत्या.