उस्मानाबाद : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिना उजाडल्यापासून तर टंचाईचे चटके अधिक तीव्र बनले असून जलस्त्रोत झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे टंचाई निवारणार्थ उपाययोजनांच्या मागणीचे प्रस्तावही त्याच गतीने धडकू लागले आहेत. आजघडीला टँकरने चाळीशी ओलांडली असून अधिग्रहणांची संख्या तर तब्बल साडेतीनशेवर पोहोचली आहे.
यंदा मान्सूच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्या वार्षिक सरासरीच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला. त्यामुळे लघु, मोठे अन् मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. त्यामुळे अनेक गावांना ऐन हिवाळ्यातच टंचाईचे चटके बसण्यास सुरूवात झाली. अशा गावांमध्ये आजघडीला अत्यंत भीषण स्थिती आहे. दरम्यान, सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. पारा ३७ अंश सेल्सिअसवर जावून ठेपला आहे. उन्हाच्या वाढलेल्या या तीव्रतेमुळे जलस्त्रोत झपाट्याने कारेड पडत आहेत. त्यामुळे दिवसागणिक टंचाईचे संकट गडद होत असल्याचे चित्र आहे. टंचाई निवारणार्थ ग्रामपंचायतींकडून मोठ्या प्रमाणात प्रस्ताव दाखल होत आहेत. मात्र, आलेल्या प्रस्तावांना अपेक्षित गतीने मंजुरी दिली जात नाही, असा आरोप ग्रामपंचायतींकडून केला जात आहे.
आजघडीला जिल्ह्यातील २५६ गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे़ यापैकी २१८ गावांसाठी विहीर, कुपनलिकांसारख्या स्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अशा अधिग्रहणांची संख्या ३५८ वर जावून ठेपली आहे. तर दुसरीकडे ज्या गावांच्या परिसरात अधिग्रहण करण्यासाठीही स्त्रोत उपलब्ध नाहीत, तेथे टँकरच्या माध्यमातून तहान भागविली जात आहे.
जिल्हाभरातील ३८ गावांना तर ३८ गावातील १ लाख ७ हजार ८२४ नागरिकांची तहान ४७ टँकर्सच्या पाण्यावर भागविली जात आहे़ सध्या उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, जवळे दु़ या १२ गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ तर तुळजापूर तालुक्यात भातंब्री, उमरगा तालुक्यातील बेळंब, कळंब तालुक्यातील शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा (खं़),शेलगांव (ज़), पिंपळगाव (डो़), पाडोळी या ८ गावांना तर भूम तालुक्यातील वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरुड, सावरगाव (दरे़),वारेवडगाव कासारी, गोमाळा कृष्णापूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, आंतरगाव या ११ गावे त्याचबरोबर परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुकडगाव अशा ४ गावांचा समावेश आहे़ असे एकूण जिल्हाभरातील ३८ गावांतील १ लाख ७ हजार ८२४ ग्रामस्थांची तहान ४७ टँकरच्या माध्यमातून भागविली जात आहे.
या गावांना टँकरने पाणी....उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, कौडगाव (बावी), रुई ढोकी, नांदुर्गा, खामगाव, येडशी, बेंबळी, ताकविकी, केशेगाव, करजखेडा, वाणेवाडी, जवळे (दु़). तुळजापूर- भातंब्री, उमरगा तालुक्यातील बेळंब. कळंब-शिंगोली, ताडगाव, भाटशिरपुरा, देवळाली, मस्सा (खं़),शेलगांव (ज़), पिंपळगाव (डो़), पाडोळी. भूम-वालवड, गिरवली, सोन्नेवाडी, पखरुड, सावरगाव (दरे़), वारेवडगाव कासारी, गोमाळा कृष्णापूर, आंबी, हिवर्डा, गोलेगाव, आंतरगाव. परंडा तालुक्यातील कात्राबाद, कंडारी, मुगाव, कुकडगावला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.