कळंब : सरकारी नोकरी म्हटली की बदली आलीच. हा स्थित्यंतराचा भाग असला तरी कर्तव्य बजावत असताना सर्वांशी स्नेहबंध निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली अनेकांना दुरावा निर्माण करणारी वाटते. याचाच प्रत्यय कळंब येथे आला असून, नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या निरोपाच्या कार्यक्रमात स्वतः त्यांना अन् उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.
जमादार यांची कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे बदली झाली. यानिमित्ताने कळंब येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निरोप समारंभ आयोजित केला होता. यावेळी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, तहसिलदार रोहण शिंदे, गट विकास अधिकारी मोहन राऊत, मंडळ अधिकारी तुळशीराम मटके, एन. बी. भिसे, अनिल अहिरे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप पारखे, तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, तलाठी, कोतवाल उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार अस्लम जमादार यांचा सपत्नीक उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्याहस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला. सूत्रसंचालन सुहास जेवळीकर यांनी तर आभार अव्वल कारकून शिंदे यांनी मानले.
यावेळी जमादार मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तालुक्याने खूप मोठे प्रेम दिले. अनेकांशी ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. आता बदलीमुळे दूर जावे लागत आहे. पण हे केवळ भौगोलिक अंतर असले तरी मनामध्ये मात्र कोणतेही अंतर राहणार नाही. यावेळी त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. यामुळे सभागृहातील उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनाही आपल्या हुंदक्यांना आवरणे कठीण झाले. अनेकांचे डोळे पाणावले. अशा धीरगंभीर वातावरणात निरोप समारंभ पार पाडून जमादार यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.