कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेली नगर परिषदेची मोकळी जागा हस्तांतरित करण्यासाठी असलेला आक्षेपाचा तांत्रिक अडथळाही आता दूर झाला असून, आतातरी नगरविकास विभागाने ही प्रस्तावित जागा आरोग्य विभागाकडे तातडीने सोपवावी अशी, मागणी कळंबकरांतून होत आहे.
कळंब शहरातील पुनर्वसन सावरगाव भागातील उपजिल्हा रुग्णालयानजीकची सर्व्हे क्र. १०० मधील नगरपरिषदेच्या मालकीची जवळपास सव्वा एकर जागा उपजिल्हा रुग्णालयाच्या वाढीव इमारतीसाठी हस्तांतरित करण्याचा ठराव नगर परिषदेने २० मार्च २०१७ रोजी विशेष सभेत मंजूर केला होता. त्यास आता चार वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे.
जागा हस्तांतरण न झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे विस्तारीकरण रखडले. यामुळे कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत कळंबकरांचे आरोग्यविषयक हाल झाले. जागेअभावी प्रशासनालाही मंगल कार्यालये, वसतिगृहे अशा वैद्यकीय सुविधा झिरो असणाऱ्या ठिकाणी कोविड सेंटर बनवावी लागली. कळंब उपजिल्हा रुग्णालयाची आहे ती इमारत कोविड रुग्णांसाठी वापरात आणल्याने सर्वसामान्य रुग्णांना शासकीय वैद्यकीय सुविधा या काळात मिळाल्या नाहीत.
सध्या वैद्यकीयदृष्ट्या आणीबाणीची परिस्थिती असताना कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या जागा हस्तांतराची फाइल नगरविकास विभाग सोडायचे नाव घेत नाही.
दोन महिन्यांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शिवसेनेच्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना ही फाइल शिवसेनेकडे असलेल्या नगरविकास विभागातून आरोग्य विभागाकडे पाठवा, कळंब उपजिल्हा रुग्णालयाला लागेल तेवढा निधी देतो, असे आवाहन केले होते. ते कोणी गांभीर्याने घेतले का नाही माहीत नाहीे; परंतु चार वर्षानंतर ही जागा हस्तांतरित करण्यासाठी नगरपरिषद स्तरावर काही तांत्रिक बाबी पार पडल्या नसल्याचे समोर आले.
यानंतर न.प. प्रशासनाने त्वरेने या जागा हस्तांतराबाबत कोणाला काही आक्षेप आहे का, याचे जाहीर प्रगटन देऊन आक्षेप मागवून घेतले. मात्र, विहित मुदतीत या मुद्द्यावर कोणीच आक्षेप घेतला नाही. विशेष म्हणजे कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु, तांत्रिक प्रक्रिया म्हणून आता हा सोपस्कारही पार पडला आहे.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कळंबकरांनी अनेक जिवाभावाची माणसे गमावली आहेत. तिसऱ्या लाटेच्या अंदाजाने भीती वाढली आहे. जागा हस्तांतरित झाली तरी लगेच इमारत उभी राहणार नाही; पण कोरोनासारख्या लाटा घेऊन येणारे पुढील आजार तरी सर्वसुविधांयुक्त रुग्णालयाच्या इमारतीमुळे कळंब शहर व परिसरातील नागरिकांना सुसह्य होतील, अशी अपेक्षा आहे.
चौकट -
आरोग्य संचालकांच्या भेटीने आशा वाढल्या!
कळंब उपजिल्हा रुग्णालयाला बुधवारी राज्याच्या आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यापुढे उपजिल्हा रुग्णालयातील अडचणी अनेकांनी मांडल्या. येथे भौतिक, वैद्यकीय सोईसुविधा, तज्ज्ञ मनुष्यबळ वाढविणे किती गरजेचे आहे याची मांडणीही करण्यात आली. डॉ. पाटील यांच्याबरोबर विभागीय आरोग्य संचालक व जिल्हा शल्य चिकित्सक ही ‘की’ पोस्टवरील मंडळीही होती. त्यामुळे येथील परिस्थिती तिन्ही टप्प्यावर पोहोचली आहे. ही भेट कळंब उपजिल्हा रुग्णालयासाठी फलदायी ठरू शकते, याची शक्यता वाढली आहे.
फाइलीचा पुन्हा प्रवास सुरू
नगर परिषदेने उपजिल्हा रुग्णालयाला देऊ केलेल्या जागेबाबत कोणाचा आक्षेप नसल्याचे न.प. प्रशासनाने सर्व तांत्रिक प्रक्रिया करून जिल्हा नगररचनाकार यांना लेखीपत्र पाठवून कळविले आहे. तेथून ती फाइल जिल्हा प्रशासन, विभागीय कार्यालय व पुढे मंत्रालय असा प्रवास करणार असल्याची माहिती आहे. चार वर्षांनंतर पुन्हा त्या फाइलचा प्रवास झिरोपासून चालू झाला आहे. आता या फाइलचा वनवास तरी लवकर संपावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.