धाराशिव - हिवाळा असाे की पावसाळा. संपूर्ण शहर पहाटे गाढ झाेपेत असताना रस्त्यांवर वावर असताे ताे सफाई कामगारांचा. मात्र, याच सफाई कामगारांना सध्या आपल्या घामाच्या पैशांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळाेवेळी मागणी करूनही हक्काची मजुरी काही मिळाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडाेच्या संख्येने मजुरांनी गुरुवारी तडक पालिका गाठली अन् प्रवेशद्वारातच ठिय्या दिला. पाच-पाच आठवड्यांची मजुरी मिळत नसेल तर, आम्ही लेकरंबाळं जगवावी कशी? हे नगरपालिका अन् ठेकेदारानं पुढं येऊन सांगावं, अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
धाराशिव पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे नियमित सफाई कामगारांची संख्या नगण्यच आहे. अपुऱ्या मनुष्यबळावर संपूर्ण शहराची स्वच्छता करणे शक्य नसल्याने ठेकेदाराच्या माध्यमातून मजुरांची मदत घेतली जाते. आजघडीला असे साधारपणे साडेतीनशे ते चारशे राेजंदारी मजुरांच्या खांद्यावर शहर दुर्गंधीमुक्त ठेवण्याची धुरा आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून या मजुरांना त्यांच्या हक्काची मजुरी वेळेवर मिळत नव्हती. प्रत्येक महिन्यात एक-दाेन आठवडे ड्राॅप केले जात हाेते. पहाटे उठून शहर दुर्गंधीमुक्त करूनही घामाचे पैसे मिळत नसल्याने मजुरांतून नाराजी व्यक्त हाेत हाेती. मात्र, मजुरी काही हाती पडली नाही. अखेर गुरुवारी संतप्त झालेल्या तीनशेवर मजुरांनी शहर स्वच्छतेचे काम बंद ठेवत थेट पालिका गाठली. आमच्या घामाचे पैसे द्या, ताेवर दारातून उठणार नाही, अशी कठाेर भूमिका घेतली. आमची घरं मजुरीच्या पैशांवर चालतात आणि चार-पाच आठवडे जर हक्काची मजुरी मिळत नसेल तर आम्ही आमची लेकरंबाळं जगवावीत कशी? असा संतप्त सवालही पालिकेला केला. बराच काळ मजूर पालिकेच्या प्रवेशद्वारात तळ ठाेकून हाेते. यानंतर संबंधित ठेकेदाराने साेमवार-मंगळवारपर्यंत मजुरी देऊ, अशी ग्वाही दिली. यानंतर संतप्त मजुरांनी पालिका साेडली.