वाशी (उस्मानाबाद) : इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपाकडे वळणाऱ्या ट्रकवर भरधाव वेगातील टेम्पो आदळला. या अपघातात टेम्पोतील शेतकरी जागीच ठार झाला. तर चालक गंभीर जखमी आहे. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला. ही घटना शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील सरमकुंडी शिवारातील पेट्रोलपंपानजीक घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, वाशी तालुक्यातील औरंगाबाद ते सोलापूर या महामार्गावरील सरमकुंडी शिवारात मोटे यांचा पेट्रोलपंप आहे. सरकी पेंड घेऊन जाणारा ट्रक (क्र.एमएच.१२/क्यूए.९६३६) इंधन भरण्यासाठी सदरील पेट्रोलपंपवार जात होता. याचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेला टेम्पो (क्र. एमएच.१०/५७८०) संबंधित ट्रकवर जावून आदळाला.
या भिषण अपघातात टेम्पोमध्ये बसलेले शेतकरी सुभाष बाबुराव तळेकर (वय ५०, रा. शहापूर, ता. अंबड, जि. जालना) यांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोचालक कृष्णा परमेश्वर भाकड हे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान, टेम्पोची धडक ही ट्रकच्या डिझेलच्या टाकीला बसल्यामुळे ट्रकने पेट घेतला. या आगीमध्ये ट्रकसह सरकी पेंडही जळून खाक झाली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोनि सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनिल रणदिवे हे घटनेचा तपास करीत आहेत.