उस्मानाबाद : राज्य परिवहन महामंडळाने कंत्राटदारांकडून ५०० साध्या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, याबाबत निविदाप्रक्रिया सुरू झाली आहे. ही निविदाप्रक्रिया थांबविण्यात यावी, अशी मागणी राज्य परिवहन कास्ट्राईब संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केले आहे, तत्कालीन परिवहनमंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी वेतनवाढीचा दर १ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झाली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर ५०० बस घेण्याची निविदाप्रक्रिया स्थगित करण्यात यावी, जुलै २०२१ महिन्याचा पगार देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर राज्य परिवहन महामंडळाचे कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष रेश्मा हुंबे, विभागीय सचिव विजयकुमार कांबळे, विभागीय कोषाध्यक्ष प्रवण शिरसाटे आदींच्या सह्या आहेत.