उस्मानाबाद : बदलती जीवनशैली अन् वाढलेली धावपळ निरोगी व्यक्तींनाही आजाराकडे घेऊन जात आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या राष्ट्रीय कुटूंब व आरोग्य सर्वेक्षणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये ४४ टक्के महिला तर जवळपास ५० टक्के पुरुष रक्तदाबाने त्रस्त असलेले निष्पन्न झाले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रोजगाराच्या पुरेश्या संधी नाहीत. काम मिळाले तरी त्याबदल्या मिळणारा मोबदला पुरेसा नसतो. त्यामुळे साहजिकच मानसिक तणाव वाढत चालला आहे. सातत्याने दुष्काळ किंवा अतिवृष्टी, गारिपटीमुळे मोठ्या संख्येने असलेला शेतकरीवर्गही तणावपूर्ण जीवन जगताना दिसत आहे. याचा परिणाम थेट शरिरावर होत असून, रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालले आहे. आजघडीला निम्मे पुरुष सौम्य, मध्यम व उच्चरक्तदाबाने त्रस्त आहेत. तसेच महिलांचेही प्रमाण ४४ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
रक्तदाब वाढण्याचे कारण...
बदललेली जीवनशैली, वाढलेला ताणतणाव, वरचेवर कमी होत चाललेली सहनशक्ती, कामाचा वाढलेला स्ट्रेस या काही प्रमुख बाबी रक्तदाब वाढण्यामागे कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
काय घ्यावी काळजी...
रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी किंवा तो होऊच नये यासाठी प्रत्येकानेच सकस अहारावर भर दिला पाहिजे. याशिवाय, नियमित व्यायाम व योगासने करणे गरजेचे आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपल्या आवडीच्या बाबी, छंदाना काही वेळ जरुन काढला पाहिजे.
कोट...
सध्या तिशीतल्या तरुणांमध्येही रक्तदाबाचे प्रमाण वढीस लागले आहे. या जनरेशनची सहनशक्ती कमी झाली आहे. आहार व जीवनशैली बदलली. व्यसनही यास कारणीभूत ठरत आहे. या बाबी टाळून व्यायाम व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
-डॉ.मनोज देव्हारे, फिजिशिअन