उस्मानाबाद : काेराेनाच्या संकटामुळे सुरुवातीला दहावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या हाेत्या. परंतु, हे संकट निवळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर राज्य शासनानेही परीक्षा रद्द केल्या. तसेच विद्यार्थ्यांना सरसकट अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे यंदा सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागणार आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी सर्वांसाठी एकत्र सीईटी घेण्यात येणार आहे. मात्र ही परीक्षाही ऐच्छिक असणार आहे.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दहावीच्या परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या हाेत्या. त्यानुसार २२ हजार ६७५ विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेचे शिक्षण विभागाकडून नियाेजनही करण्यात आले हाेते. हे सर्व सुरू असतानाच काेराेनाची दुसरी लाट येऊन धडकली. पहिलीच्या तुलनेत ही लाट अधिक तीव्र आहे. रुग्णवाढीसाेबतच मृत्यूचे प्रमाणही अधिक हाेते. त्यामुळे शासनाने या परीक्षा काही काळ पुढे ढकलल्या हाेत्या. मात्र काेराेनाचा संसर्ग वाढतच गेल्याने थेट परीक्षा रद्द करण्यात आली. सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी सर्वांसाठी एकच सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, ही परीक्षाही ऐच्छिक असेल. जे विद्यार्थी ही परीक्षा देतील, त्यांना गुणानुक्रमे काॅलेजमध्ये प्रवेश दिला जाईल. यानंतर रिक्त राहणाऱ्या जागेसाठी परीक्षा न दिलेल्या अन्य विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. शासनाचा हा निर्णय ताेडगा काढणारा असल्याचे काही पालकांचे म्हणणे असून त्यांनी समाधान व्यक्त केले. तर कहींनी मात्र हा निर्णय हितकारक नसल्याचे नमूद केले.
असे असेल नव्हे सूत्र...
दहावी परीक्षेसाठी प्रविष्ठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना त्यांच्या नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालास ५० गुण देण्यात येणार आहेत. एवढेच नाही तर दहावीच्या अंतर्गत लेखी मूल्यमापनास ३० गुण तर दहावीच्या अंतिम ताेंडी तसेच प्रात्यक्षिक परीक्षेस २० गुण दिले जाणार आहेत. या गुणांच्या आधारेच त्यांना दहावी उत्तीर्ण करण्यात येणार आहे.
विद्यार्थी खूश....
काेराेनाच्या संकटामुळे शाळा बंद हाेत्या. त्यामुळे जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावर विसंबून राहावे लागले. काही शाळांकडून चांगली तयारी करून घेण्यात आली. परंतु, काही शाळांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नाही. हे चित्र ग्रामीण भागात ठळकपणे दिसून येते. त्यामुळे असे विद्यार्थी चिंतेत हाेते. परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न त्यांच्यासमाेर हाेता. परंतु, आता परीक्षाच रद्द करण्यात आल्याने हे विद्यार्थी खूश झाले आहेत.
शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात...
१) दहावीच्या परीक्षा होणार नसल्याने सर्व विद्यार्थी उत्तीर्ण समजायचे आहेत. यामुळे गुणवत्ता स्पष्ट होत नसली तरी महाराष्ट्र शासनाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी एक सीईटी परीक्षा ठेवलेली आहे ती परीक्षा योग्य आहे. सदरील सीईटी परीक्षा अभ्यासक्रमाचे सर्व मुद्दे घेऊन होणार आहे. यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थित होईल.
सुरेश टेकाळे, जिल्हाध्यक्ष, उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ.
पुढील प्रवेशाचे काय हाेणार?
दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना सरसकट अकरावीच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी सीईटीच परीक्षा घेण्यात येणार आहे. ती ऐच्छिक असेल. या परीक्षेतील गुणांप्रमाणे प्रवेश निश्चित केले जातील. यानंतर ज्या जागा रिक्त असतील, त्या ठिकाणी परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.