- चेतन धनुरेतेर (जि.उस्मानाबाद) : गेल्या काही दिवसांपासून तेरणा मध्यम प्रकल्प क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसाने तेरणा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. यामुळे प्रकल्पातील पाण्याची आवक वाढून शुक्रवारी पहाटे तो ओव्हरफ्लो झाला. यामुळे उस्मानाबाद शहरासह या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. सोबतच १हजार ६५२ हेक्टर शेतीला सिंचनासाठी या पाण्याचा फायदा होणार आहे.
सलग तीन वर्षे भरले...तेरणा प्रकल्प सलग तीन वर्षे पूर्ण क्षमतेने भरला आहे. २०२० मध्ये २१ सप्टेंबर रोजी तो भरला होता. २०२१ मध्ये २३ सप्टेंबर तर यावर्षी ५ ऑगस्ट रोजी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. प्रकल्पाची क्षमता १९.६६३ दलघमी इतकी आहे. २००३ ते २०२२ या १९ वर्षांच्या कालावधीत प्रकल्प आठ वेळा पूर्ण क्षमतेने भरला आहे. यापूर्वी २००६, २००८, २०१०, २०१६, २०१७, २०२०, २०२१, २०२२ या वर्षांत तो भरला होता.