पाथरुड : कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरलेल्या भूम तालुक्यातील वडाची वाडी येथे पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने शनिवारी अँटीजन कोरोना चाचणी शिबिर घेतले. यात तब्बल ५१० नागरिकांची तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, यातून केवळ नऊजण कोरोनाबाधित आढळले.
वडाची वाडी येथे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने हे गाव कोरोना हाॅटस्पाॅट ठरत होते. त्यामुळे येथील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकारातून व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून हे शिबिर घेण्यात आले. यात बालकांपासून वृध्दांपर्यंत सर्वांचीच चाचणी करण्यात आली. यावेळी केलेल्या एकूण ५१० चाचण्यांपैकी ५०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर नऊजण बाधित निघाले. रात्री उशिरापर्यंत ही चाचणी सुरू होती.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. महेश गिरी, डाॅ. आकाश घोगरे, सामुदायिक वैद्यकीय अधिकारी दराडे, आरोग्य सहायक एम. एन. मडके, आरोग्य सेविका बागडे, आरोग्य सेवक विश्वास भोंगाळे, आशा कार्यकर्ती मनिषा माने, शिक्षक नितीन गिरी, शिवाजी आडसूळ यांच्यासह ग्रामसेवक, उपसरपंच, पोलिस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, रुग्णसंख्या कमी आढळून आली असली तरी नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहेच.