तुळजापूर (जि. धाराशिव) : विवाहानंतर श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असताना नवदाम्पत्याच्या जीपचे अचानक टायर फुटले असता, भरधाव जीप पलटी झाली. या भीषण अपघातात मामा-भाची असे दाेघेजण जागीच ठार झाले, तर अन्य चाैदाजण जखमी आहेत. ही घटना शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तुळजापूर-औसा महामार्गावरील करजखेडा शिवारात घडली.
बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यातील लंजवड येथील चव्हाण कुटुंबातील मुलाचा ४ मे राेजी विवाह साेहळा पार पडला हाेता. त्यामुळे हे संपूर्ण कुटुंबीय श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी जीपमधून (केए १७ सी १२१३) औसा मार्गे तुळजापूरकडे येत हाेते. ही जीप धाराशिव तालुक्यातील करजखेडा शिवारात आली असता अचानक टायर फुटले असता, भरधाव जीप पलटी झाली. या अपघातात नवरदेवाचे वडील विष्णू नारायण चव्हाण (वय ६०, रा. लंजवड) व आत्याची मुलगी मंदाकिनी दत्ता परिहर (३२, रा. पुणे) या मामा-भाचीचा जागीच मृत्यू झाला, तर शिवनंदा जनार्दन चव्हाण (५०), पुष्पा अर्जुनराव सोरेकर (६०, रा. परभणी), अंजली सुनील पवार (१८), अरुणा सुनील दहे (३५), अक्षरा सुनील पवार (१२), प्रद्युम्न विष्णू चव्हाण (२५), सुनील लक्ष्मण दहे (३१), सोनाली बळीराम चव्हाण (१७), अभिषेक शेषेराव चव्हाण (२१), श्रेयश श्रीपाद परिहर (११), सुनीता विनोद चव्हाण (३०), सुमित शिवाजी चव्हाण (६०), साहिल सुनील दहे (५), श्रेया सुनील दहे (४) हे जखमी झाले आहेत. दाेघा मृतांसह जखमींना तातडीने स्थानिकांच्या मदतीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी काहींवर प्रथमाेपचार करून पुढील उपचारासाठी लातूर येथे नेण्यात आले.
नवरा-नवरी सुखरूप...मृत विष्णू चव्हाण यांचा मुलगा प्रद्युम्न चव्हाण याचा अंजलीशी दोन दिवसांपूर्वीच म्हणजे ४ मे रोजी विवाह झाला होता. नवदाम्पत्यासोबत चव्हाण कुटुंबीय नातेवाइकांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत होते. त्यांच्या जीपला अपघात झाला असता दाेघे जागीच ठार झाले, तर चाैदा जण जखमी झाले असून, नवरा-नवरी मात्र सुखरूप आहेत.