धाराशिव : ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत खुर्चीतून खाली ढकलून दिल्याची घटना वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी बुधवारी दोन महिला सदस्यांच्या पतींविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाखनगाव ग्रामपंचायतीत निर्मला लक्ष्मण लाखे (वय ६०) या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. २५ एप्रिल रोजी सकाळी ग्रामपंचायतीची मासिक बैठक बोलाविण्यात आली होती. यासाठी सरपंच निर्मला लाखे, उपसरपंच लक्ष्मण लाखे, ग्रामसेवक तुकाराम बिरारी यांच्यासह काही ग्रामपंचायत सदस्यही उपस्थित होते. परंतु, काही सदस्य आले नसल्याने कोरम पूर्ण होत नव्हता. त्यामुळे हे पदाधिकारी अन्य सदस्यांच्या प्रतीक्षेत होते. याच वेळी गावातील संतोष ऊर्फ एकनाथ दिलीप लाखे व शिवाजी ऊर्फ बाळू भीमराव गिरी हे दोघे सभागृहात आले.
यावेळी सरपंचांनी त्यांना सध्या मिटिंग सुरू असून, आपल्या दोघांच्याही पत्नी सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना मिटिंगला पाठवून द्या, असे सांगितले. यावर उपरोक्त दोघेही ‘आम्हाला बाहेर जा म्हणणारी तू कोण?’ असे म्हणत सरपंचावर धावून गेले. सरपंच पती असणारे उपसरपंच लक्ष्मण लाखे व ग्रामसेवक तुकाराम बिरारी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही ढकलून देऊन जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद सरपंच निर्मला लाखे यांनी बुधवारी वाशी पोलिस ठाण्यात दिली. यावरून उपरोक्त दोघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.