कळंब (जि.धाराशिव) : पैश्यासाठी चोरटे नेमके कुठल्या थराला जातील याचा सध्या काही नेम नाही. कळंब शहरात असाच एक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. पैश्यासाठी चोरट्यांनी चक्क एटीएम मशिनच उचकटून नेले आहे. यामध्ये सुमारे २९ लाख रुपये असल्याचा प्राथमिक कयास आहे.
कळंब शहरातील जिजाऊ चौक येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. परिसरात मोठी व्यापरपेथ असल्याने या एटीएमवर नियमित मोठी आर्थिक उलाढाल सुरू असते. चोरट्यांनी नेमकी हीच बाब हेरून या एटीएमला लक्ष्य केले. बुधवारच्या पहाटे अज्ञात चोरांनी आतील रोकड काढण्यात वेळ न घालवता थेट मशीनच उचकटून नेले. ही घटना सकाळी निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, या एटीएम मध्ये सुमारे २९ लाखांची रोकड असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
याबाबत बँकेचे व्यवस्थापक कांतीलाल गुलदगड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, रक्कम भरण्याचे काम एजन्सीकडे असते. त्यामुळे नेमकी किती रोकड होती हे आत्ताच सांगता येणार नाही.