कळंब (उस्मानाबाद) : एकीकडे ग्रामीण रस्त्यांची सुधारणा होत नसल्याने चिखलवाट तुडवावी लागत असताना दुसरीकडे मात्र कोट्यावधीचा निधी मंजूर होवूनही काही कामांना कंत्राटदार हात लावत नसल्याचे चित्र आहे. अशाच मंजूर रस्त्याचे काम सुरू केले जात नसल्याने खामसवाडीच्या त्रस्त ग्रामस्थांनी चक्क रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात लोटांगण घेत ठिय्या आंदोलन केले.
अनेक ठिकाणी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारक, शेतकऱ्यांना चिखलवाट तुडवीत रस्ता कापावा लागतोय. अशी वाईट स्थिती असताना जिपच्या काही रस्त्यांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडकमधून कोट्यावधीचा निधी मंजूर होत निविदा प्रक्रियाही पार पडली आहे. खेर्डा ते नागझरवाडी रस्त्यासाठीही साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला, पण काम सुरू न केल्याने खामसवाडीच्या ग्रामस्थांना डबक्यातील पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. नेहमीच्या त्रासाला कंटाळून आज शिवसेनेचे उपतालुकप्रमुख तथा माजी पंस सदस्य अमोल पाटील यांच्या नेतृत्वात आज लोटांगण आंदोलन करण्यात आले. खेर्डा ते नागझरवाडी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या चिखलात ठिय्या मारत ग्रामस्थांनी लोटांगण घातले. आंदोलनात संतोष कोळी, धनंजय कोळी, बालाजी बप्पा, राजेंद्र शेळके, बाळासाहेब कोळी, बाळासाहेब पाटील, लाला पवार आदींचा सहभाग होता. दरम्यान, प्रशासनाकडून उपअभियंता अझरुद्दीन सय्यद यांनी पुढच्या आठ दिवसांमध्ये काम मार्गी लागेल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.