कळंब (जि. उस्मानाबाद) -प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाची जीप येरमाळ्याकडे जात असताना अचानक रस्त्यावर आडव्या आलेल्या गायीला जाेराची धडक बसली. यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही जीप लग्नकार्यासाठी निघालेल्या एका कारला धडकली. या भीषण अपघातात दाेघांचा मृत्यू झाला. तर नऊ जण जखमी झाले आहेत. हा विचित्र अपघात तालुक्यातील वडगाव (ज.) पाटीनजीक गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला.
उस्मानाबाद येथील प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाची जीप (क्र. ०६-एडब्लू. ४३०१) कॅम्पसाठी येरमाळ्याकडे निघाली हाेती. या वाहनामध्ये मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत शिंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कुणाल होले, महामंडळाचे वाहतूक नियंत्रक बाळासाहेब काळे, अनंत आदमाने व सुनील पडवळ हे हाेते. ही जीप वडगाव (ज.) पाटीनजीक आली असता, समाेरून अचानक गाय आडवी आली. जीपची गायीला जाेराची धडक बसली. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि तेरखेडा येथून विवाह कार्यासाठी निघालेल्या गाेळे कुटुंबीयांच्या कारला (क्र. एमएच.१२-पीएच२५०३) धडकली बसली.
या भीषण अपघातात जीपमधील महामंडळाचे वाहतूक नियंत्रक बाळासाहेब बाबूराव काळे व कारमधील ऊर्मिला सुरेश गोळे (वय ५५) अशा दाेघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आरटीओ पथकातील श्रीकांत शिंदे, कुणाल हाेेले, आनंद अदमाने व सुनील पडवळ तर कारमधील वैशाली धीरज गोळे (वय ३०), चंद्रकला सदाशिव गोळे (वय ५९), धीरज दत्तात्रय गोळे (वय ३५), शिवप्रसाद धीरज गोळे (वय ३) व प्रकाश सदाशिव गोळे (वय ४४) हे जखमी झाले आहेत. यातील प्रकाश यांना सोलापूर येथे तर उर्वरितांवर उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी बघ्यांची गर्दी...जीप आणि कारची भीषण धडक झाल्याचे समजताच घटनास्थळी बघ्यांनी माेठी गर्दी केली हाेती. यातील काहीजण जखमींना मदत करीत हाेते तर काही माेबाईलमध्ये फाेटाे काढण्यात गुंतले हाेते.
पाेलीस पथके मदतीला...घटनेनंतर अवघ्या काही क्षणात येरमाळा, येडशी ठाणे तसेच हायवे पाेलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील व्यक्तींना उचलून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयात पाठविले.
१०८ अन् १०३३ धावली मदतीला...१०८ व १०३३ या क्रमांकाच्या दाेन रुग्णवाहिका तातडीनेे घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमींना वेळेवर रुग्णालयात भरती करता आले.