धाराशिव : हौसेला मोल नसते म्हणतात, ते खरेच. धाराशिव शहरालगतच असलेल्या राघुचीवाडी येथील एका पशुपालकाने घरात जन्मलेल्या रेडकाचा मंगळवारी सायंकाळी पाळणा घालून ‘मलिंगा’ असे नामकरणही केले. मांडव टाकून ५०० लोकांची पंगत उठवत महिलांच्या हस्ते मलिंगाचा पाळणाही झुलवला.
धाराशिव शहरापासून जवळच असलेल्या राघुचीवाडी येथील बाजीराव करवर हे पशुधनावर जीवापाड प्रेम करतात. त्यातही रेड्यांचा असलेला त्यांचा नादच खुळा. २८ वर्षांपूर्वी त्यांनी पहिला रेडा आणला होता. आपल्या ७ म्हशी, ४ गाई, २ बैलांच्या ताफ्यात सध्या ‘सावळ्या’ नावाचा त्यांचा लाडका रेडाही आहे. हा सावळ्या काही दिवसांपूर्वीच पिता बनला. घरातीलच म्हशीने रेडकू दिल्याने बाजीरावांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मग त्यांनी २१ व्या दिवशी रीतसर पाळण्याचा बेत आखला. गावात डिजिटल लावून लोकांना निमंत्रण दिले. पत्रिका तयार करून समाजमाध्यमातून नातेवाइक, मित्रांनाही बोलावले. मंगळवारी सायंकाळी हा सोहळा पार पडला. त्यात नव्या रेडक्याचे नाव ‘मलिंगा’ असे ठेवण्यात आले. त्यांच्या या सोहळ्याची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे.
मुलांपेक्षा जास्त जीव जडलाबाजीराव हे चांगलेच रेडाप्रेमी आहेत. त्यांना दोन मुले असून, त्यांचाही पाळणा, अशा पद्धतीने घातला गेला नव्हता. घरातच तो सोहळा उरकला होता. मात्र, नव्या रेडक्यासाठी पंगत उठवून वाजत-गाजत घातलेल्या पाळण्याने त्यांचे रेडाप्रेम दिसून येते.
मंडप घातला, फटाके उडवलेमलिंगाच्या नामकरण सोहळ्यासाठी घरापुढे मांडव घालून स्पीकर लावलेला होता. त्याच्यासाठी नवा पाळणा अन् गादीही आणली. ती फुलाने सजवून महिलांनी नामकरणाची गाणी गात नाव ठरविल्यानंतर फटाके उडवून पंगत उठवण्यात आली.
अडीच एकर शेती विकलीबाजीरावांकडे सध्या ७ एकर शेती आहे. मागील काही वर्षांत रेड्यांवर मोठा खर्च त्यांनी केला. सावळ्या हा त्यांच्याकडील अठरावा रेडा असल्याचे त्यांनी सांगितले. अपेक्षेहून जास्त खर्च झाल्याने अडीच एकर गहाण ठेवलेली शेती सोडून द्यावी लागल्याचेही बाजीराव म्हणाले.