वाशी (जि. धाराशिव) : येथील छत्रपती शिवाजी विद्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहाच्या लाेखंडी ॲंगलला दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी दुपारी १२:०० वाजता उघडकीस आली. यानंतर मृतदेह परस्पर उत्तरीय तपासणीसाठी पाठविल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रूग्णालय परिसरात गाेंधळ घालत कारवाईची मागणी केली. या प्रकरणी वाशी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद झाली.
वाशी शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयात पिंपळगाव लिंगी येथील संग्राम अशाेक कांबळे हा १६ वर्षीय विद्यार्थी दहावीच्या वर्गात शिकत हाेता. बुधवारी सकाळी शाळा सुरू झाल्यानंतर त्याने पहिले तीन तास केले. यानंतर दुपारी १२:०० वाजता १५ मिनिटांचा ब्रेक झाला. याच काळात त्याने शाळा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात जावून लाेखंडी ॲंगलला नायलाॅन दाेरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
याचवेळी एक विद्यार्थी लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेला असता, ही घटना उघडकीस आली. लागलीच शाळा व्यवस्थापनाने वाशी पाेलिसांना घटनेची माहिती दिली. पाेलीसही तातडीने घटनास्थळी पाेहाेचले. यानंतर पाेहेकाॅ. शिवाजी लाेंढे यांनी घटनेचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले. दरम्यान, आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट असून वाशी ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.
मृतदेह परस्पर उत्तरीय तपासणीसाठी का पाठविला?
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत संग्रामचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. ताेवर शव उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविले हाेते. या प्रकाराने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी पाेलीस आणि शाळा व्यवस्थापनाविरूद्ध राेष व्यक्त करीत परस्पर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविलाच कसा, असा सवाल केला. नातेवाईकांच्या राेषामुळे काहीकाळ रूग्णालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते.