समुद्रवाणी (जि.उस्मानाबाद) : कृषी पदविका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या समुद्रवाणी येथील एका विद्यार्थ्यावर परीक्षा सुरू असताना कॉपीबद्दल कारवाई झाली होती. यामुळे नैराश्यातून त्याने गुरुवारी सायंकाळी आत्महत्या केल्याचा प्रकार रात्री उशिरा उघडकीस आला. याबाबत बेंबळी ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
समुद्रवाणी येथील स्वप्निल फुलचंद ढोबळे (२१) हा येडशी येथील कृषितंत्र विद्यालयात कृषी पदविकेचे द्वितीय वर्षातील शिक्षण घेत होता. सध्या या वर्गाच्या परीक्षा सुरू आहेत. स्वप्निलही ही परीक्षा देत होता. गुरुवारी त्याचा येडशी येथे पेपर होता. या पेपरदरम्यान, लातूर येथून आलेल्या भरारी पथकाने त्याला कॉपी करताना पकडले होते. यानंतर त्याला रेस्टिकेट करण्यात आल्याची चर्चा उठली. स्वप्निल पेपर देऊन गावात पोहोचण्यापूर्वीच अशी माहिती गावात पोहोचली होती. यामुळे व्यथित झालेला स्वप्निल घराकडे गेलाच नाही. येडशीहून त्याने तडक आपल्या गावानजीकच्या शेताकडे धाव घेतली. तेथे त्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, तो घरी न आल्याने भावाने त्याचा शोध सुरू केला. सगळीकडे फोन करुन त्याने माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा पत्ता लागत नव्हता. रात्री शेताकडे चक्कर टाकली असता तेथे त्याने नेलेली दुचाकी आढळल्याने शिवारात स्वप्निलचा शोध घेतला असता एका झाडाला त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. बेंबळी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर शुक्रवारी त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मोलमजुरी करून देत होते शिक्षण...स्वप्निलच्या वडिलांचा तो लहान असतानाच अल्प आजाराने निधन झालेले आहे. अभ्यासात हुशार असल्याने आई व त्याच्या मोठ्या भावाने शिक्षणाची जबाबदारी घेऊन ते कर्तव्य निभावत होते. आई मजुरी करीत होती. तर भाऊ एका वर्कशॉपमध्ये काम करुन स्वप्निलचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करीत होते. यातच अशी घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.