धाराशिव/ढाेकी : दारूड्या पतीच्या त्रासाला कंटाळून काेंड येथील एका महिलेने आपल्या तीन चिमुकल्यांसह तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. ही धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. गावात दारूबंदीची मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले. त्यामुळेच ही घटना घडली, असा आराेप करीत नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
काेंड येथील राणी बनसाेडे (४०) यांचे पती दारूच्या आहारी गेले हाेते. सतत दारू पिऊन ते कुटुंबाला त्रास देत. हा त्रास वाढतच गेल्याने राणी बनसाेडे या अनुष्का बबन बनसाेडे (१४), राजवीर बबन बनसाेडे (१०) आणि राजनंदिनी बबन बनसाेडे (७) या आपल्या तीन मुलांसह १७ एप्रिलच्या रात्री घराबाहेर पडल्या. नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शाेध घेतला. परंतु, तपास लागला नाही. असे असतानाच १८ एप्रिलच्या रात्री उशिरा शिवारातील एका तलावाच्या पाण्यावर मुलीचे प्रेत तरंगताना आढळून आले. ही माहिती मिळताच ढाेकी पाेलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थ बुधवारी सकाळी तलावस्थळी दाखल झाले. यानंतर पाण्यात शाेध घेतला असता, राणी बनसाेडे यांच्यासह तीन चिमुकल्यांचे मृतदेह आढळून आले.
दरम्यान, ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव घेऊनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैधरित्या दारू विक्री सुरूच हाेती. त्यामुळेच मयत राणी बनसाेडे यांच्या पतीला दारूचे व्यसन जडले. वेळीच अवैधरित्या दारूविक्रीवर बंदी घातली असती तर ही घटना घडली नसती, असे सांगत नातेवाईक व ग्रामस्थांनी शव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दुपारी १२:३० वाजेपर्यंतही शव ताब्यात घेतलेले नव्हते. त्यामुळे तलावस्थळी माेठी गर्दी झाली हाेती.