धाराशिव : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहीरात असलेली भंगार अवस्थेतील बस वाहतुकीसाठी साेडल्याचा मुद्दा विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात उपस्थित केला हाेता. यानंतर भूम आगाराकडून संबंधित भंगार बस फेरीसाठी बाहेर काढल्याच्या कारणावरून तीन कर्मचार्यांविरूद्ध गुरूवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली हाेती. महामंडळाची ही कारवाईही विधिमंडळात चर्चेची ठरली असता साेमवारी तिघांचेही निलंबन मागे घेण्यात आले.
भूम आगारातील एमएच २०/ बीएल ०२०६ या क्रमांकाच्या बसची अवस्था अतिशय वाईट होती. खिडक्यांना काचा नव्हत्या. त्यामुळे आगार प्रशासनाने ती राखीव (पेंडिंग) ठेवून तसा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. असे असतानाही काही दिवसांपूर्वी ती बस फेरीसाठी बाहेर काढण्यात आली. याच बसेस राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांची जाहीरातही हाेती. हेच छायाचित्र विराेधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशना दाखवत सरकारला धारेवर धरले हाेते.
गुरूवारी भूम आगाराने राखीव बस फेरीसाठी बाहेर काढल्याचा ठपका ठेवत आगारातील वाहन परीक्षक डी. बी. एडके, एस. एन. हराळ आणि ए. यू. शेख यांच्यावर निलंबनाची कारवाई केली हाेती. दरम्यान, कर्मचार्यांविरूद्धची कारवाईही विधिमंडळ अधिवेशनात चर्चेची ठरली. अखेर साेमवारी या तिन्ही कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. ताेंडी आदेशानुसार हे कर्मचारी कामावर रूजू झाले. लेखी आदेश मंगळवारी दिले जाणार असल्याचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.