धाराशिव : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांचे अनेक प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही प्रलंबित प्रश्न सोवडवले जात नाहीत. त्यामुळे प्रलंबित प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक संघाने सोमवारी आक्रमक होत जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्राथमिक शिक्षकांतून प्राथमिक पदवीधर शिक्षक दर्जावाढ देण्यात यावी, विनंती केलेल्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदावनत करावे, माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकांची पदे भरावीत, पदोन्नतीने केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरावीत, बिंदू नामावली अद्यावत करावी, प्रलंबित पुरवणी देयकासाठी आर्थिक तरतूद करावी, वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव निकाली काढावेत, भविष्य निर्वाह निधीचे परतावा व ना-परतावा अग्रीम प्रस्ताव मान्य करण्याचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना द्यावेत, २०२०-२०२१ च्या संचमान्यतेनुसार शिक्षकांचे तात्पुरते केलेले समायोजन कायमस्वरूपी करावे, सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांना रजा रोखीकरणाचा लाभ देण्यात यावा, कोरोना काळात शिक्षकांनी संकलित केलेल्या निधीचा विनियोग करावा, विषय तज्ज्ञ व साधन व्यक्ती यांच्या दीर्घवास्तव्य सेवाजेष्ठतेनुसार बदल्या कराव्यात, अशा मागण्या लावून धरल्या होत्या. आंदोलनात शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य उपाध्यक्ष सोमनाथ टकले, जिल्हाध्यक्ष संतोष देशपाडे, राज्य चिटणीस भक्तराज दिवाने, यांच्यासह शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.