उस्मानाबाद : दूध दरवाढीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जमा करावे, अन्यथा सरकारमधील मंत्र्यांना दुग्धाभिषेक घालण्यात येईल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
दूध दरवाढ प्रश्नी शुक्रवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, पशुधनासह मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘दूधाच्या दरात घसरण झाली आहे. त्यास केंद्र तसेच राज्य सरकारचे धोरण आणि कडक लॉकडाऊन जबाबदार आहे. दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली; परंतु, काहीच मार्ग निघाला नाही. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अद्याप चर्चा होऊ शकली नाही.’’ ते ‘मातोश्री’बाहेर पडत नाही, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. दूध उत्पादकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने प्रतीलिटर ५ रूपये अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करावे. अन्यथा मंत्र्यांना दुग्धाभिषेक घातला जाईल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
६ कोटी लिटर दूध गेले कुठे? दूध दरवाढीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ६ एप्रिल रोजी सरकारने बैठक घेऊन दुधाला २५ रुपये व वाहतुकीसाठी २ रुपये, असा २७ रुपये दर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आला. ६ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत सरकारने ६ कोटी लिटर दूध खरेदी केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केल्यानंतरही दर काही उंचावले नाहीत. त्यामुळे ६ कोटी लिटर दूध गेले कुठे, असा सवाल माजी खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.