उस्मानाबाद : काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का, याचा आढावा घेेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणेला केल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाकडूनही काेराेनामुक्त गावांचा आढावा घेतला जात आहे. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावांमध्ये आजघडीला एकही व्यक्ती काेराेनाबाधित नाही. त्यामुळे शासनाचा सकारात्मक निर्णय झाल्यास काेराेनामुक्त गावांतील शाळा सुरू हाेऊ शकतात.
काेराेनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने आठवी ते बारावीदरम्यानचे वर्ग टप्प्या-टप्प्याने सुरू केले हाेते. या शाळा सुरळीत हाेत असतानाच काेराेनाची दुसरी लाट धडकली. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र स्वरूपाची असल्या कारणाने शासनाने पुन्हा शाळा बंद केल्या. मागील काही महिन्यांच्या तुलनेत काेराेना संसर्गाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे शासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंध काहीअंशी शिथिल करण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काेराेनामुक्त गावांमध्ये पाचवी ते दहावीदरम्यानचे वर्ग सुरू करता येऊ शकतात का, याचा आढावा घेण्याची सूचना जिल्हास्तरीय यंत्रणांना केली हाेती. त्यानुसार शिक्षण विभागही कामाला लागला आहे. गावनिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानुसार आजघडीला जिल्ह्यातील ७२१ पैकी ६०८ गावे अशी आहेत, जिथे काेराेनाचा एकही रुग्ण नाही. म्हणजेच ही सर्व गावे काेराेनामुक्त आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाचा हा अहवाल सादर झाल्यानंतर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय झाल्यास जिल्ह्यातील सुमारे ६०८ गावांमध्ये शाळांची घंटा पुन्हा वाजू शकते.
चाैकट...
१,४८७
जिल्ह्यातील एकूण शाळा
१,०७९
जिल्हा परिषद शाळा
२७०
अनुदानित शाळा
३९
अंशत अनुदानित
काेणत्या वर्गात किती विद्यार्थी
२५,६६५
पाचवी
२६,०३७
सहावी
२५,५४७
सातवी
२५,२२४
आठवी
७,०२१
जिल्ह्यातील एकूण गावे
६०८
सध्या काेराेनामुक्त असलेली गावे
तालुकानिहाय काेराेनामुक्त गावे
लाेहारा २९
उमरगा ९०
कळंब ७८
उस्मानाबाद ११७
तुळजापूर १०४
वाशी ३२
भूम ७२
परंडा ८६
जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये सध्या काेराेनाचा एकही रुग्ण नाही, अशा गावांचा आढावा घेण्याच्या सूचना वरिष्ठांकडून मिळाल्या हाेत्या. त्यानुसार आपल्याकडे सहाशेपेक्षा अधिक गावे काेराेनामुक्त आहेत. ही माहिती वरिष्ठांना कळविली जाणार आहे.
- गजानन सुसर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.