उमरगा ( धाराशिव) : उमरगा तालुक्यातील जकेकूर -येळी शिवारात बुधवारी ( दि.१९) रात्री नागरिकांना वाघ दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वनविभागाकडून रात्री उशिरापर्यंत या भागात सर्च ऑपरेशन सुरु होते. गेली दीड दोन महिने येडशी अभयारण्यात वावरणारा वाघ तेथून उमरगा तालुक्यात आला असावा असा कयास आहे.
ग्रामसेवक लक्ष्मण जकेकुरे हे आपल्या कारने बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान सोलापूरवरून येत असताना जकेकूरवाडी पाटीवर महामार्ग ओलांडून अगदी १०० फुटावरून वाघ बलसूर शिवारात गेल्याचे दिसले. याबाबत त्यांनी येळीगावचे उपसरपंच रामलिंग बिराजदार यांना कळविले. तसेच इतर काही जणांनी ही वाघ दिसल्याचा दावा सोशल मीडियावर केल्याने वनविभागाच्या टीमने रात्री दहा-अकराच्या सुमारास जकेकूर शिवारात सर्च ऑपरेशन सुरू केले. पण रात्रीची वेळ असल्याने शोध कार्य मर्यादित होते. त्यानंतर वनविभागाने गुरुवारी परत सकाळपासून त्याभागात शोध कार्य सुरू केले आहे.
याबाबत वन परिमंडळ अधिकारी मुक्ता गुट्टे यांनी सांगितले की, आम्ही त्या भागात शोध कार्य सुरू केले असून वाघ असल्याचे पुरावे मिळतात का? याची पाहणी करत असून नेमका कोणता प्राणी आहे हे ठसे मिळाल्यानंतर समजणार आहे. यापूर्वी या भागात तरस हा प्राणी आढळलेला असून तो दुरून वाघासारखा दिसतो तोही असू शकतो पण सर्व शक्यताच्या पातळीवर शोध घेतला जाणार असल्याचे सांगितले.वाघ आल्याच्या चर्चाने मात्र येळी, जकेकूर, बलसुर गावातील नागरिक दहशतीत आहेत.