उस्मानाबाद : अतिवृष्टीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान होऊनही केवळ तांत्रिक कारण समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारली आहे. यासंदर्भात राज्य शासनाकडूनही चालढकल केली जात असल्याचे सांगत पुढील दिशा ठरविण्यासाठी आ.राणाजगजितसिंह पाटील हे ७ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांची बैठक घेणार आहेत.
खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ९ लाख ४८ हजार ९९० अर्जाद्वारे ५ लाख १८ हजार ६५ हेक्टर क्षेत्रासाठी त्यांच्या हिश्श्याचा ४१ कोटी ८५ लाख रुपये हप्ता भरला आहे. यात राज्य सरकारने त्यांचा ३२२ कोटी ९५ लाख रुपये तर केंद्राने २७४ कोटी २१ लाख रुपये हप्ता विमा कंपनीकडे भरला आहे. दरम्यान, सप्टेंबर व ऑक्टोबरच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीनंतर जिल्ह्यातील ७९ हजार १२१ तक्रारी विमा कंपनीकडे प्राप्त झाले. त्यातील ६९ हजार २३१ अर्ज पात्र ठरवून ८३ कोटी ५६ लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत ४८ हजार ४४२ अर्जदारांना ४९ कोटी २१ लाख रुपये वाटप केले आहेत. अद्याप २० हजार ७८९ अर्जदारांचे ३४ कोटी ३५ लाख रुपये प्रलंबित आहेत. दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काही प्रमाणात मदत केली. मात्र, हक्काच्या विम्याची रक्कम मात्र त्यांना मिळत नाही. कंपनीने शेतकऱ्यांना ॲपवर अर्ज करण्याची अट टाकली होती. मात्र, त्यासाठीही काही दिवसांचीच मुदत दिली. याशिवाय, बहुतांश शेतकऱ्यांना अर्ज करताच आले नाहीत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले गेले आहे. ही बाब राणाजगजितसिंह पाटील यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या तसेच अर्ज करू न शकलेल्या इतर वंचित शेतकऱ्यांना विमा मिळावा, यासाठी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे १२ जानेवारी रोजी तांत्रिक दोष निदर्शनास आणून देत शासनाने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. तेव्हा भुसे यांनी याबाबत आश्वासित केले हाेते. मात्र, अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ठोस काही कृती झाली नाही. यासंदर्भात आ. पाटील यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते याच आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहेत. मात्र, शासनाकडून याप्रश्नी चालढकल होत असल्याने पुढील संघर्षाची दिशा ठरविण्यासाठी रविवारी शिंगोली सर्किट हाऊस येथे सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांसोबत आ.पाटील हे बैठक घेणार आहेत. यास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.