काेराेनाच्या पहिल्या लाटेत शिक्षकांवर काेराेना कक्षासह अन्य जबाबदाऱ्या साेपविण्यात आल्या हाेत्या. ही लाट ओसरते ना ओसरते ताेच दुसरी लाट आली. पूर्वीच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. ही लाट थाेपविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार विविध उपाययाेजना राबविल्या जात आहेत. याहीवेळी शिक्षकांकडे काही जबाबदाऱ्याही दिल्या आहेत. दिलेल्या जबाबदाऱ्या गुरूजी निभावत आहेत. आजघडीला जिल्ह्यातील पावणेचार हजारावर शिक्षक या कामात आहेत. असे असतानाही त्यांना विमा संरक्षण देण्याची बाब फारशी गांभीर्याने घेतली जात नसल्याचे मागील काही घटनांवरून समाेर आले. काेराेनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावताना चार शिक्षक दगावले. या शिक्षकांना ५० लाखांचा विमा मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने डिसेंबर २०२० मध्ये शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला. चार ते पाच महिन्यांचा कालावधी लाेटूनही संबंधित शिक्षकांच्या कुटुंबीयांना छदामही मिळालेला नाही. शिक्षण विभागाकडून पाठपुरावाही करण्यात आला; परंतु, त्याचाही काहीच उपयाेग झाला नाही. त्यामुळे संबंधितातूंन तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे.
काेट...
काेराेना महामारीचे संकट थाेपविण्यासाठी शिक्षकांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. संबंधित शिक्षक ठरवून दिलेली कामे करत आहेत. या काळात कर्तव्य बजावताना चाैघा शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना ५० लाखांचा विमा मिळावा, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु, अद्याप पैसे मिळाले नाहीत.
-डाॅ. माेहरे, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद.
काेराेनाच्या काळात इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकही गावपातळीवर दिलेली जबाबदारी चाेख निभावत आहेत. त्यामुळे त्यांनाही पाेलीस, आराेग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचे विमा कवच देणे गरजेचे आहे. घाेषणा झाली परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी हाेताना दिसत नाही. ही बाब सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
- कल्याण बेताळे, शिक्षक.
काेराेनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्यावर असताना चार शिक्षकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शासनाकडून अशा शिक्षकांचे ५० लाखांच्या विम्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले हाेते. शिक्षण विभागाकडून डिसेंबर २०२० मध्ये प्रस्तावही दाखल केले. परंतु, अद्याप एकाही प्रस्तावास मंजुरी नाही.
-बशीर तांबाेळी, शिक्षक.
स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने शिक्षकांकडे कुठल्याही स्वरूपाची साधणे नाहीत. असे असतानाही संबंधित सध्या ‘डाेअर टू डाेअर’ जावून दिलेली जबाबदारी पार पाडत आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, विम्याचा लाभ देताना दुजाभाव हाेत आहे. हे याेग्य नाही.
- वैजिनाथ सावंत, शिक्षक.