जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशावरून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली डोमगाव पुनर्वसन गावांची पाहणी.....
जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशावरून अधिकाऱ्यांनी घेतली बैठक
(फोटो : विजय माने २६)
परंडा : तालुक्यातील डोमगाव नंबर १, डोमगाव नंबर २ पुनर्वसन येथील प्रकल्पग्रस्त गावकरी व शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी गावात बैठक घेतली. तसेच गावातील नागरी सुविधा, भूखंड वाटप व इतर सेवासुविधा संदर्भात प्रत्यक्ष पाहणी केली. यामुळे येथील ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे.
मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर सीना नदीकाठी वसलेले २ हजार २३ लोकवस्तीचे डोमगाव सन २००० मध्ये धरणग्रस्त झाले होते. सीना-कोळेगाव धरण निर्मितीला मंजुरी मिळाल्यानंतर डोमगावची सन २००१ मध्ये डोमगाव क्रमांक १ व डोमगाव क्रमांक २ अशी विभागणी झाली. गेल्या २० वर्षांच्या काळामध्ये या गावांचे यथायोग्य पुनर्वसन झालेले नाही. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी याव्यतिरिक्त कसलेही काम झालेले नाही. हक्काची स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते, लाईट बत्ती, नाल्या या नागरी सुविधांपासून ग्रामस्थ वंचित आहेत. पाणी पुरवठा योजना निकृष्ट दर्जाची असल्याने अद्यापपर्यंत ती कार्यान्वित करण्यात आली नाही. आज ना उद्या पुनर्वसन होईल, या आशेवर ग्रामस्थ २० वर्षांपासून या समस्यांचा सामना करीत आहेत.
या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासन दरबारी धूळखात असल्याने माजी आमदार राहुल मोटे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. तसेच तात्काळ या गावांचे पुनर्वसन करून येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी लेखी पत्राद्वारे केले होते. यानुसार जलसंपदा मंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर सोमवारी जलसंपदा विभागाचे जिल्हा अधीक्षक रामकिसन शिंगाडे, सीना-कोळेगाव विभागाचे अधिकारी सोमशेकर हारसुरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांसह डोमगावला भेटी देऊन प्रलंबित कामाची पाहणी केली. त्यानी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बैठक घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक बापू मिस्कीन, सरपंच महादेव पोकळे, उपसरपंच सोमनाथ साबळे, ग्रामपंचायत सदस्य किरण शिंदे, सहदेव खैरे, बाबासाहेब गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, शहाजी साबळे, बाबुराव काळे, राजाभाऊ लोमटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट....
राहुल मोटे यांच्या पत्राची घेतली दखल
सीना कोळेगाव धरण निर्मितीच्यावेळी डोमगावचे दोन भागात विभाजन झाले. मात्र, अद्याप मूलभूत सुविधांची पूर्तता झालेली नाही या अनुषंगाने माजी आमदार राहुल मोटे यांनी २५ जून रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र देऊन दोन्ही गावातील अंतर्गत रस्ते, गटारी योजना, पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे, भूखंड वाटप, विद्युत खांब व तारा यांचे नूतनीकरण, स्मशानभूमीसाठी जागा, सार्वजनिक शौचालय निर्मिती आदी कामे संबंधित विभागाकडून तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित विभागाला तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश दिले होते.
फोटो कॅप्शन.....
डोमगाव येथील निकृष्ट दर्जाच्या व कार्यान्वित नसलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी करताना जलसंपदा विभागाचे जिल्हा अधीक्षक रामकिसन शिंगाडे, सीना-कोळेगाव विभागाचे अधिकारी सोमशेकर हारसुरे आदी.
260721\psx_20210726_124516.jpg
डोमगाव येथील निकृष्ट दर्जाच्या व कार्यान्वित नसलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी करताना जलसंपदा विभागाचे जिल्हा अधीक्षक रामकिसन शिंगाडे, सीना-कोळेगाव विभागाचे अधिकारी सोमशेकर हारसुरे व त्यांच्यासोबत असलेले अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ....