उस्मानाबाद - उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील दत्ता चौधरी या व्यक्तीने आपल्या मुलांची नावं चक्क पंतप्रधान आणि राष्ट्रपती अशी ठेवली आहेत. चिमुकल्या बाळांची नावं आगळ्या-वेगळ्या स्वरुपाची ठेवली जाण्याच्या घटना हल्ली कॉमन झाल्या आहेत. मात्र, चिंचोली (भूयार) येथील दत्ता व कविता चौधरी यांनी नुकत्याच पार पडलेल्या नामकरण विधीत आपल्या नवजात बालकाचे नाव पंतप्रधान असे ठेवले. विशेष म्हणजे, त्यांच्या पहिल्या मुलाचे नाव ''राष्ट्रपती'' आहे. त्यामुळे आता राष्ट्रपती व पंतप्रधान हे दोघे एकाच कुटुंबात वाढणार आहेत.
चौधरी दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले होते. तसे आधारकार्डही त्यांनी बनविले आहे. तर १० नोव्हेंबर २०२१ रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ''पंतप्रधान'' ठेवले आहे. मुलाचे जन्म ठिकाण असलेल्या सोलापूर येथील महानगरपालिकेतून ''पंतप्रधान दत्ता चौधरी'' या नावाने ते जन्म प्रमाणपत्र घेणार आहेत. ग्रामीण भागात बाळांच्या नामकरणाचा पाळणा सोहळा करण्याची प्रथा जुनी आहे. त्यानुसार पंतप्रधानाचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात केला गेला. त्यासाठी खास पाळणा, आकर्षक सजावट केली, पाहुण्यांना निमंत्रण दिले. मग बाळाच्या कानात कुर्रर्र करुन त्याचं नाव ठेवलं गेलं. परंपरा जपत अगदी उत्साहात चौधरी कुटुंबाने आपल्या दोन्ही मुलांचा नामकरण सोहळा केलाय.
राजकीय नेते मंडळी, चित्रपटातील अभिनेते-अभिनेत्री, देवादिकांची नावं आपल्या बाळाला दिली जाण्याची प्रथा आहे. मात्र, देशाच्या सर्वोच्च पदाची नावंच आपल्या बाळाला देण्याचं काम दत्ता आणि कविता चौधरी यांनी केलं आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती’ आणि ‘पंतप्रधान’ हे दोघे भाऊ आता एकाच घरात बागडताना दिसणार आहेत.
नावाचा कर्तृत्वावर प्रभाव पडतो
लग्नाच्या अगोदर पासूनच मी मुलांची नावे राष्ट्रपती व पंतप्रधान ठेवण्याचा विचार केला होता. नावाचा त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर प्रभाव पडतो असे माझे मत आहे. माझ्या मुलाची नावे घटनात्मक पदाची आहेत. मात्र, यामागे माझा सकारात्मक दृष्टिकोन आहे. माझ्या मुलावर योग्य संस्कार करून त्यांना नावाप्रमाणेच बनवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.- दत्ता चौधरी, भुयार चिंचोली, उमरगा