उस्मानाबाद : तालुक्यातील तेर (तगर) गावाचे ऐतिहासिक महत्त्व राज्य, देश व जागतिक पातळीवर पाेहोचावे. पर्यायाने पर्यटनास चालना मिळावी या दृष्टिकाेनातून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने तेरचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यानंतर जागतिक वारसा स्थळ नामांकनासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. याकामी पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.
प्राचीन काळी ताकारपद, तगर, थेर अशा विविध नावांनी प्रचलित असणाऱ्या संत श्रेष्ठ श्री संत गोरोबा काका यांचा सहवास लाभलेल्या तेर नगरीला ऐतिहासिक व धार्मिक वारसा आहे. येथे अनेक प्राचीन मंदिरे असून, पुरातत्वीय अवशेष सापडलेले आहेत. येथील पर्यटनास चालना देण्यासाठी तेरणा ट्रस्टच्या सहकार्यातून बृहत आराखडा तयार करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबई येथील पुरातत्व खात्याचे संचालक डाॅ. तेजस गर्गे यांची भेट घेऊन सूचना केल्या हाेत्या. त्यानुसार संचालकांनी पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या नामिकासूचीतील वास्तुविशारदांकडून स्वारस्य प्रकटन मागविण्यात आले. त्यावर या कामासाठी चाैघांनी स्वारस्य दाखविले. संबंधित चाैघांचेही तेर येथे ३१ डिसेंबर २०२० व १ जानेवारी २०२१ राेजी चर्चासत्र ठेवले हाेते. यावेळी कामाची व्याप्ती, स्वरूप, तांत्रिक बाबींची त्यांना माहिती देऊन प्राथमिक सादरीकरणासाठी ४५ दिवसांचा कालावधी दिला हेाता. यानंतर २२ फेब्रुवारी राेजी चाैघा वास्तुविशारदांचे तेरणा ट्रस्ट मुंबई येथे आराखडा तसेच प्रस्तावाचे प्राथमिक सादरीकरण झाले. यावेळी अमोल गोटे, सहायक अभिरक्षक, तेर संग्रहालय, तगरचे अभ्यासक रेवणसिद्ध लामतुरे, ह. भ. प. दीपकजी खरात, सरपंच नवनाथ नाईकवाडी, तेरणा ट्रस्टचे समन्वयक बाळकृष्ण लामतुरे, आदी उपस्थित हाेते. दरम्यान, सादरीकरणाच्या आधारे बृहद विकास आराखडा स्थानिक कमिटीने ‘तेरणा’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल दिला. त्यानुसार एकात्मिक बृहद विकास आराखडा तयार करण्यासाठी वास्तुविशारद स्मिता कासार पाटील, अजिंक्यतारा कन्सल्टन्स्, नाशिक यांची निवड करण्यात आली. तर जागतिक वारसा स्थळ नामांकन यादीमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रस्ताव तयार करण्याकरिता वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, असोसिएट्स, पुणे यांची निवड करून कार्यारंभ आदेश दिले. या कामासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला आहे.
चाैकट...
तेर (तगर) गावाचे ऐतिहासिक महत्त्व राज्य, देश व जागतिक पातळीवर पाेहोचावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिला टप्पा म्हणून तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्याने तेरचा बृहत विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. हे काम वास्तुविशारद स्मिता कासार पाटील यांच्याकडे साेपविले आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामकाज चालणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर विकासाला चालणा मिळेल अन् तेर जागतिक पातळीवर पाेहोचेल.
- राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर.