एमएच १२ एसएफ ५८९८ क्रमांकाचा एक ट्रक कोईम्बतूर येथून अंतर्वस्त्रांची खोकी घेऊन औरंगाबादकडे निघाला होता. २१ जुलै रोजी पहाटे विश्रांती घेण्यासाठी चालक श्यामनाथ फुलचंद पाल यांनी हा ट्रक तामलवाडी टोलनाक्यानजीक थांबविला होता. येथे वाहन थांबवून ते विश्रांती घेत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या ट्रकमधून अंतर्वस्त्रांची दोन खोकी पळवून नेली. यामध्ये सुमारे ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला. हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर श्यामनाथ पाल यांनी तामलवाडी पोलिसांत धाव घेऊन याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
लग्नासाठी आणलेली पितळी भांडी चोरली
उस्मानाबाद : घरातील लग्नसमारंभासाठी आणलेली पितळी भांडी चोरीला गेल्याची घटना लोहारा तालुक्यातील अचलेर येथे घडली आहे. याप्रकरणी मुरुम ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अचलेर येथील शाणप्पा नागप्पा सरसंबे यांनी लग्नकार्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमावाजमव केली होती. यात रुखवतात देण्यासाठी त्यांनी सुमारे ४२ हजार रुपये किमतीची पितळी भांडीही खरेदी केली होती. ही भांडी त्यांनी आपल्या घराजवळीलच गोदामात ठेऊन दिली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी रात्रींच्या सुमारास गोदामाचे कुलूप तोडून आत ठेवलेली ही भांडी पळवून नेली आहे. हा प्रकार सरसंबे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुरुम पोलीस ठाणे गाठून ४२ हजार रुपयांची भांडी चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला.