तुळजापूर : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी तुळजापूर येथे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले़. तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात जागरण-गोंधळ घालून आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात झाली.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर समाजबांधव आक्रमक झाले आहेत़. आरक्षणाबाबतचा निर्णय तातडीने होण्यासाठी तिसरे पर्व सुरु करण्यात आले असून तुळजापूर येथून या पर्वाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून तुळजाभवानी देवीच्या महाद्वारात मोठ्या संख्येने जमलेल्या समाजबांधवांच्या साक्षीने जागरण- गोंधळ सुरु करण्यात आला़. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी आंदोलकांच्या स्वागतासाठी कमानी उभारण्यात आल्या होत्या़. घरांवर- दुकानांवर झेंडे लावण्यात आले असून आंदोलकांच्या गर्दीने तुळजापूर शहर लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच गजबजलेले दिसून आले़.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजाभवानी देवीच्या महाद्वारासमोरील मुख्य मंचावर येऊन अभिवादन केले़ आणि लगेचच ते मंचाखाली उतरुन मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी झाले़. उन्हातही त्यांनी रस्त्यावरच बैैठक घालून आंदोलनात नोंदविलेला सहभाग आंदोलनकर्त्यांचे मनोधैर्य आणखीनच उंचावणारा ठरला. खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनीही मोर्चेकऱ्यांमध्ये सहभागी होत रस्त्यावरच बैठक घातली.