मुरुम - शहरातील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी १३ जणांची रॅपिड ॲंटिजन चाचणी करण्यात आली. यात फक्त शहरातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या २०४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १४५ जणांनी कोरोनावर मात केली. आजवर शहरातील चौघांचा मृत्यू (दुसरी लाट) झाला.
शहरातील लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मार्च महिन्यात काेराेनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर हळूहळू रुग्णवाढीचे प्रमाणही वाढले. शहरातील यशवंतनगर, संभाजीनगर, नेहरूनगर, शास्त्रीनगर, किसान चौक, सोनार गल्ली, हनुमान चौक, आदी भागांत कोरोनाचे २०४ रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील १४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ५५ आहेत. चौघांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरातील कोविड रुग्णालयात उमरगा व लोहारा तालुक्यांतील ३२ रुग्ण उपचार घेत असून उपचारानंतर बरे झालेल्या सातजणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील ग्रामीण रुग्णालयात सहा गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.