शहर व परिसरात लॉकडाऊनमुळे कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक कमी होत असल्याचे चित्र दिसून येत असले तरी चिंता मात्र कायम आहे. उमरगा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत २४५ कोविड संशयित आणि संपर्कातील लोकांची रॅपिड अँटिजन चाचणी सोमवारी करण्यात आली. यात ग्रामीण भागात १६ नव्या रुग्णांची भर पडली. डिग्गी प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत येणाऱ्या कंटेकूर गावात एकाच दिवसात ७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले, तर औराद, गुंजोटी, कराळी तांडा येथे प्रत्येकी एक रुग्ण असे दहा रुग्ण आढळून आले. येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत दाळिंब व धानुरी येथे प्रत्येकी दोन, कोरोळ येथे एक रुग्ण नव्याने आढळून आला. मुळज प्राथमिक केंद्राअंतर्गत एक असे एकूण १६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मुरूमपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर कंटेकूर गाव असून, या गावातील सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसागणिक रुग्ण संख्या कमी होत असली तरी कोरोनाचा संसर्ग मात्र सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून ३५०० नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे. यामध्ये कोव्हॅक्सिनचे २२००, तर काेविशिल्डच्या१ हजार ३०० डोसचा समावेश आहे, अशी माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत बाबरे यांनी दिली.
मुरूम ग्रामीण रुग्णालयात साडेतीन हजार लाेकांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 4:32 AM