उस्मानाबाद : काजागिरी पौर्णिमेला तुळजापुरात मोठी यात्रा भरते. या यात्रेला सुमारे ८ ते १० लाख भाविक जमत असतात. ही गर्दी टाळण्यासाठी यंदा मंदिर प्रशासनाने यात्राच रद्द केली आहे, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत ( Next three days no entry in Tuljapur) जिल्हाबंदी लागू केली आहे. त्यामुळे तीन दिवस तुळजापूर किंबहुना जिल्ह्यातच कोणत्याही नागरिकांना नो एंट्री असणार आहे.
शारदीय नवरात्र महोत्सवातील कोजागिरी पौर्णिमेस तुळजापुरात सर्वात मोठी यात्रा भरत असते. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा यावेळी रद्द करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. १९ व २० ऑक्टोबरला असलेल्या या पौर्णिमेच्या दिवशी राज्यातीलच नव्हे, तर शेजारच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगणा राज्यातील भाविकांची सर्वाधिक वर्दळ असते. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाबंदीचे आदेश दिले आहेत, तर पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी अवजड मालवाहतुकीच्या वाहनांना तुळजापूर मार्ग बदलून अन्य मार्गे वाहतूक वळविण्याचे आदेश दिले आहेत. १८, १९ व २० ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी हे आदेश लागू असणार आहेत. या कालावधीत जिल्ह्यात, तसेच तुळजापुरातही केवळ रुग्णसेवा, पोलीस, अग्निशमन, एसटी व अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे भाविकांनी किंवा इतरही प्रवाशांनी तीन दिवसांसाठी उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.वाहतूक मार्गात बदल...दरम्यान, वाहनांना प्रवेशबंदी असली, तरी आडवाटेने पायी येणारे भाविक जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. उस्मानाबादहून हैद्राबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना औसा-उमरगा मार्गाचा पर्याय दिला आहे. औरंगाबादहून हैद्राबाद जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना मांजरसुंबा-लातूर-उमरगा मार्ग, उस्मानाबादहून सोलापूरकडे जाणाऱ्या व येणाऱ्या वाहनांना वैराग मार्ग, लातूर ते सोलापूरसाठी बार्शी-येडशी-मुरुड मार्ग, तर औरंगाबाद ते सोलापूरसाठी येरमाळा-बार्शी मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.