उमरगा ( उस्मानाबाद ) : लातूरहून सागवानी फळ्या घेऊन कर्नाटकातील रायचूरच्या दिशेने निघालेला एक टेम्पो उलटल्याची घटना आज पहाटे उमरग्याजवळ घडली आहे़ यात ३ मजूर जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर आहेत़
लातूर येथून सागवानाच्या फळ्या घेऊन एमएच १३ एएन ६९५६ क्रमांकाचा टेम्पो मध्यरात्रीच्या सुमारास कर्नाटकातील रायचूरकडे रवाना झाला होता़ दरम्यान, पहाटे २ वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो उमरग्यापासून पुढे ७ किमी अंतरावर चालकाच्या निष्काळजीपणामुळे उलटला़ या घटनेत टेम्पोत बसलेल्या ५ मजुरांच्या अंगावर या फळ्या पडल्या़ त्यातील ३ मजूर गुदमरुन जागीच ठार झाले आहेत़ तर अन्य दोघे अत्यवस्थ आहेत़ घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत व जखमींना उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले़ त्यातील तिघे मयत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले़ जखमींवर उपचार सुरु करण्यात आले आहेत़ सर्वच मजूर हे रायचूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे़ यापैकी एकाचेही नाव अद्याप निष्पन्न झालेले नाही़ संबंधितांचे नातेवाईक रायचूर येथून आल्यानंतरच त्यांची नावे कळतील, अशी माहिती उमरगा पोलिसांनी दिली़