उस्मानाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकण्याच्या बेताने संशयास्पद हालचाली करणाऱ्या तिघांना वाशी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरात आणली जाणारी शस्त्रेही पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर फाटा ते खानापूर फाटा दरम्यान दरोडेखोरांनी उच्छाद मांडला आहे. वाहने अडवून लूटमार करण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी पंढरपूरच्या एका व्यापाऱ्यासही अशाच पद्धतीने लुटण्यात आले होते. या गुन्ह्याचा पोलिसांनी लागलीच छडा लावून आरोपी जेरबंद केले असले तरी पुन्हा असे प्रकार अन्य गुन्हेगारांकडून केले जात आहेत. त्यांचे हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी वाशी पोलिसांनी या मार्गावर पेट्रोलिंग वाढवली आहे. सोमवारी रात्री वाशी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद हे आपल्या कर्मचाऱ्यासह याच मार्गावर गस्त घालत होते. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर फाटा ते खानापूर फाटा दरम्यान काही व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तेव्हा पोलिसांनी दुचाकीवरुन फिरत असलेल्या सुनिल भागवत काळे, सुनिल नाना काळे (दोघे रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा) व सुरज लिंबाजी शिंदे (रा. मांडवा) या तिघांना ताब्यात घेतले. तर इतर दोघे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी दुचाकीसह तिघांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात लोखंडी कोयता, विळा, लोखंडी गज असे साहित्य आढळून आले. रात्री ते हे साहित्य ताब्यात ठेवून या भागात कशासाठी फिरतात, याची विचारणा पोलिसांनी केली असता आरोपी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. त्यामुळे हे आरोपी दरोड्याच्या उद्देशानेच फिरत असल्याचा संशय बळावल्याने त्यांना शस्त्रांसह ताब्यात घेऊन कलम ३९९, ४०२ अन्वये वाशी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता पसार झालेल्या अन्य दोन आरोपींचा शोध घेत आहेत.