उस्मानाबाद : गावातून शिक्षणासाठी बसने शहराकडे जाताना अल्पवयीन मुलींची छेड काढणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे़ याप्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल यांनी बुधवारी तिन्ही आरोपींना ३ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंड ठोठावला आहे़
याप्रकरणातील फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिच्या मैत्रिणी बसने शिक्षणासाठी शहराकडे निघाल्या असताना आरोपी सुनिल मोहन थोरात, विजय बाबासाहेब थोरात व अविनाश महिपती रसाळ यांनी त्यांची छेड काढली़ तसेच गावाकडे परततानाही आरोपींनी पुन्हा बसमध्ये छेडछाड केली़ याप्रकरणी फिर्यादी मुलीच्या तक्रारीवरुन शिराढोण पोलिसांत कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ (ड), ३४ व बाल लैंगिक अत्याचार कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ उपनिरीक्षक एस़जी़ माने यांनी गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले़
याप्रकरणात एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले़ सरकार पक्षाचा पुरावा, साक्षी व शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल यांनी आरोपी सुनिल मोहन थोरात, विजय बाबासाहेब थोरात व अविनाश महिपती रसाळ यांना ३ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ तसेच दंड न भरल्यास १ महिन्याची अतिरिक्त शिक्षाही आरोपींना सुनावण्यात आल्याची माहिती शासकीय अभियोक्ता शरद जाधवर यांनी दिली