धाराशिव / तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा ७ ते १४ व २४ ते २८ ऑक्टाेबर या कालावधीत आहे. त्यामुळे या ११ दिवसांच्या कालावधीत सिंहासन पूजा बंद राहणार आहे. उर्वरित २० दिवस भाविकांना देवीची सिंहासन पूजा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारता येईल. यासाठी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भाविकांना नाेंदणी करावी लागणार आहे.
श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव ६ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत होत आहे. देवीची मंचकी निद्रा ७ ते १४ व २४ ते २८ ऑक्टोबरदरम्यान असल्याने या ११ दिवसांत सिंहासन पूजा बंद राहणार आहे; तर याच महिन्यातील इतर २० दिवस भाविकांना सिंहासनपूजा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारता येईल. मात्र, याकरिता भाविकांना ऑनलाइन नाेंदणी करावी लागणार आहे. २६ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० वाजेपर्यंत ही नाेंदणी करता येईल. ऑनलाइन पद्धतीने प्रथम सोडत हाेईल. भाविकांना पेमेंटसाठी सकाळी १०:३० वाजेपर्यंत ‘एसएमएस’ पाठविण्यात येतील. यानंतर २७ सप्टेंबर राेजी सकाळी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करावे लागले. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास पुन्हा ड्राॅ काढला जाईल.
या भाविकांना २८ सप्टेंबर राेजी १० वाजेपर्यंत ऑनलाइन पेमेंट करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीतही सिंहासन संख्या पूर्ण झाली नाही तर पुन्हा साेडत काढण्यात येणार आहे. पूजेसाठी नाेंदणी झालेल्या भाविकांची यादी २९ सप्टेंबर राेजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, असे मंदिर संस्थानकडून सांगण्यात आले आहे.
काेठे करता येईल नाेंदणी?
श्री तुळजाभवानी देवीच्या ऑनलाइन सिंहासन पूजेसाठी भाविकांना http://shrituljabhavani.org या संकेतस्थळावर नाेंदणी करणे बंधनकारक आहे. नाेंदणी नसल्यास ऑनलाइन सिंहासन पूजा स्वीकारता येणार नाही, असे मंदिर संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.