उमरगा : शहरात बचत गटांच्या चळवळीने व्यापक स्वरूप धारण केले असून, नगर परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत गेल्या चार वर्षात ११३ बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत दोन हजारांवर महिला याच्या सभासद असून, यातील बहुतांश महिलांनी यातून छोटे-मोठे उद्योग सुरू केले आहेत.
ग्रामीण भागात महिलांना अजूनही चूल व मूल यापुरते मर्यादित ठेवले जाते. परंतु, आज महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून, कुटुंबाचा आर्थिक भार पेलण्यातही महिला तेवढ्याच सक्षमपणे हातभार लावत आहेत. उमरगा शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, सामाजिक अभिसरण क्षमता बांधणी या घटकांतर्गत उमरगा नगर परिषद व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत सन २०१७ - १८ यावर्षी ३०, २०१८ - १९मध्ये ४५, २०१९ - २० या आर्थिक वर्षामध्ये १७, तर गेल्या २०२० - २१ यावर्षी २१ अशा ११३ महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय, २०१७पूर्वी १२० बचत गटांची स्थापना झालेली आहे. आजवर २ हजारांहून जास्त महिलांना या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
दरवर्षी महिला बचत गटांना फिरता निधी म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये दिले जातात. यावर्षी ३३ बचत गटांना दहा हजारप्रमाणे फिरता निधी म्हणून ३ लाख ३० हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच स्वयंरोजगार कार्यक्रम या घटकांतर्गत चालू आर्थिक वर्षामध्ये १६ बचत गटांना ४६ लाख एवढे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. मागील २०१८ - १९ या वर्षामध्ये ३५ बचत गटांना ३९ लाख ५० हजार रुपये, तर २०१७ - १८मध्ये १२ बचत गटांना ८ लाख ४५ हजार रुपये, तर २०१९ - २०मध्ये ३३ बचत गटांना ५६ लाख ४६ हजार रुपये विविध बँकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले होते. कर्जाची परतफेड वेळेवर केली जात असल्याने बँकांचा विश्वासही बचत गटांवर बसलेला दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश बचत गटांना बँकांकडून दुसऱ्यावेळी कर्जाला मंजुरी लगेच दिली जाते.
व्यवसायासाठी प्रशिक्षण
नगर पालिकेच्या वतीने कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटकांतर्गत २०१८ - १९ या आर्थिक वर्षामध्ये २१० प्रशिक्षणार्थींना फॅशन डिझायनिंग ट्रौशनल एग्रोईडरी रैली आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. सध्या कोरोनामुळे टॅली, फिल्ड टेक्निशियन, संगणकीय परिधीय मंत्र याचे प्रशिक्षण घेता येत नाही. परंतु, मागील वर्षी प्रशिक्षण पार पडले आहे. ‘पथ विक्रेत्यांना सहाय्य’ या घटकांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी राज्य अभियान संचालनालय यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तोदेखील मंजूर झाला असून, त्याचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. शिवाय, ज्या महिलांनी कर्ज घेऊन स्वत:चे व्यवसाय सुरु केले, त्यांच्या उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी मार्गदर्शन केले जाते, असे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे पालिकेतील समुदाय संघटक अमोल अंगरखे यांनी सांगितले.
नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरात महिला बचत गटांच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना स्वावलंबी व स्वबळावर आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यात आम्हाला चांगले यश मिळत असून, महिला बचत गटांचे पालिकेंतर्गत मोठे काम चालू आहे. पुढील काळातही याला आणखीन व्यापक स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.
-रामकृष्ण जाधवर, मुख्याधिकारी
नगर पालिकेने बचत गट स्थापन करून केलेली आर्थिक मदत आम्हाला जगण्याचा आधार आहे. मी बचत गटाच्या वतीने कर्ज काढून शेवयाची अत्याधुनिक मशीन घेऊन व्यवसाय सुरु केला आहे. हा व्यवसाय उत्तम चालत असून, बचत गटाच्या माध्यमातून आमच्या गटातील महिलांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे.
-अर्चना रणखांब, अध्यक्षा, किरण महिला बचत गट