- बाळासाहेब मानेधाराशिव : बिबट्याच्या दहशतीमुळे वन विभागाने येडशी अभयारण्यात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात शुक्रवारी रात्री वाघाेबा कैद झाले. हे वाघाेबा टिपेश्वर (जि. यवतमाळ) अभयारण्यातील असून, नांदेड, अहमदपूर परिसरातून मांजरा नदीकाठमार्गे धाराशिव जिल्ह्यात एन्ट्री केली. १९७१ नंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात वाघ आढळून आल्याचा दावा वन विभागाकडून करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत आहे. काही दिवसांपूर्वी येडशी परिसरातील दाेन जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता. यात एका गायीचा बळी गेला हाेता. या घटनेनंतर ग्रामस्थांत भीतीचे वातावरण हाेते. दरम्यान, बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने येडशी अभयारण्यासह परिसरात १५ ट्रॅप कॅमेरे लावले होते. यातील एका कॅमेऱ्यात शुक्रवारी रात्री वाघाेबा कैद झाले आहेत. या वाघाचे वय अंदाजे तीन वर्षे असून, ताे नर जातीचा आहे. दरम्यान, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात वाघ आहेत. यापैकीच भरकटलेले हे वाघाेबा नांदेड जिल्ह्यात पाेहाेचले. त्यानंतर अहमदपूर परिसरातून मांजरा नदीकाठमार्गे झाडाझुडपांचा आसरा घेत धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले, असा दावा वन विभागाने केला आहे. १९७१ पूर्वी मराठवाड्याच्या काही भागांत वाघ आढळून येत हाेते. म्हणजेच तब्बल ५० ते ५२ वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात वाघाेबा आढळून आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.
वाघ स्वतः निघून जाईल...टिपेश्वर अभयारण्यातील वाघ नांदेड जिल्ह्यातून अहमदपूरमार्गे मांजरा नदीकाठाने धाराशिव जिल्ह्यातील येडशी अभयारण्यात दाखल झाला. वस्तीत घुसून हल्ला केल्यासच वाघाला पकडण्याची परवानगी आहे. अभयारण्यात असल्याने तो स्वतः या भागातून परत निघून जाईल. सुरक्षेसाठी परिसरातील गस्त वाढवली आहे.-ए. बी. पौळ, विभागीय वनाधिकारी, धाराशिव
पुण्याचे रेस्क्यू पथक परतले...येडशीच्या अभयारण्यात बिबट्या असल्याचे समजल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पुणे येथील रेस्क्यू पथक पाचारण करण्यात आले हाेते. हे पथक त्याचा शाेध घेत असतानाच शनिवारी रात्री ट्रॅप कॅमेऱ्यात चक्क वाघाेबा कैद झाले. यानंतर हे पथक येडशीतून परतले.