धाराशिव : येथील उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या जवानाने १० ऑगस्ट रोजी दुपारी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर सोमवारी देण्यात आलेल्या तक्रारीमुळे एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शहर ठाण्यात दाखल झाला आहे.
धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील बालाजी बळीराम भंडारे (३४) हे येथील उत्पादन शुल्क विभागात जवान म्हणून कार्यरत होते. दरम्यान, अधिकारी होण्याच्या हेतूने अभ्यास करावयाचा असल्याने ते धाराशिव येथील साईराम नगरातील शुभांगी नंदु जगताप यांच्या घरी भाड्याने राहू लागले होते. दरम्यान, १० ऑगस्ट रोजी दुपारी २ ते अडीच वाजेच्या दरम्यान, भंडारे यांनी शुभांगी जगताप यांच्या बेडरुममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आनंदनगर पोलिसांनी पंचनामा करुन रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, या प्रकरणाला एका तक्रारीने वेगळेच वळण दिले आहे. सोमवारी बामणी येथील नानासाहेब अंबादास लांडे-पवार यांनी शहर पोलिसांत एक तक्रार दिली. या तक्रारीत मयत बालाजी भंडारे हे ज्यांच्या घरी राहत होते, त्या शुभांगी जगताप यांनीच त्याचा छळ करुन त्रास दिल्याने ही आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे. त्यानुसार शहर पोलिसांनी शुभांगी जगताप या महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.