(फोटो : बालाजी बिराजदार ०९)
लोहारा : सोमवारपर्यंत दुरवस्थेमुळे बंद अवस्थेत असलेल्या शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहात मंगळवारी अचानक पाणी, हँडवॉश, डस्टबीन, आरसा, बकेट आदी साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाची धावपळ सुरू झाली. त्यामुळे नागरिकांतही आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, शहरात स्वच्छतागृह पाहणीसाठी पथक येणार असल्याने प्रशासनाने ही धावपळ सुरू असल्याचे दुपारनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे केवळ पाहणीसाठी पथकाला दाखविण्यापुरतेच ही स्वच्छतागृहे आहेत का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतेवर केंद्र व राज्य सरकारकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. शहरातही या अनुषंगाने ठिक ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली. परंतु, यातील काही शौचालये बंद करुन केवळ पाचच सार्वजनिक शौचालये सुरु असल्याची दप्तरी नोंद ठेवली गेली आहे. या शौचालयाच्या स्वच्छतेसाठी महिन्याकाठी हाजारो रुपये खर्च करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. शहरातील कानेगाव रस्त्यालगतच्या शौचालयात पाणी नाही. नळ व दरवजा तुटलेला आहे. प्रभाग क्रमाक ९ मधील माशाळकर यांच्या घराच्या बाजुला शौचालय उभारले गेले. त्यांची अवस्था इतर शौचालयाप्रमाणेच आहे. प्रभाग क्रमाक ११ मध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या शौचालयात ही पाणी नाही. येथील पाईप तुटलेले असून, वीज कनेक्शन देखील नाही. आत गेले तर कमालीची दुर्गंधी जाणवते. बसस्थानकातील सुलभ शौचालयावर नगरपंचातायने दावा करत नाव टाकले असून, तेथेही पाणी उपलब्ध नाही. शिवाय, हे स्वच्छतागृह काय कुलूपबंद असते. सार्वजनिक बांधकाम कार्यालया जवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाची देखल काही प्रमाणात अशीच अवस्था ाहे. परंतु, परिसरातील काही कुटूंब नाविलाजाने याचा वापर करत आहेत.
शहरातील विविध स्वच्छतागृहांची ही स्थिती अगदी सोमवारपर्यंतची (७ मार्च) आहे. असे असतानाच मंगळवारी प्रशासनाने स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेसोबतच या ठिकाणी बकेट, पाणी, हँडवॉश आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यामुळे याबाबत अधिक चौकशी केली असता स्वच्छतागृह पाहणीसाठी पथक येणार असल्यामुळे ही धावपळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले.
कोट......
नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेकडे सतत दुर्लक्ष केले जाते. मंगळवारी मात्र केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार असल्याने पाण्यासह इतर सुविधा पुरविण्याची धावपळ सुरू केली.
- प्रताप घोडके
उपनगरध्यक्ष
लोहारा शहरातील सार्वजनिक शौचालयाची निगा व्यवस्थित राखण्यात यावी. उघड्यावर शौचास जाणे बंद व्हावे. यासाठी केवळ पथकासमोर सार्वजनिक शौचालय वापरासंबंधी उपाययोजना न करता त्या कायमस्वरुपी कराव्यात.
- अजित घोडके ,नागरिक
सार्वजनिक शौचालयाची पहाणी करण्यास केंद्रीय पथक येते, तेव्हाच नगरपंचायत प्रशासनाकडून पाणी, वीज यासह अवश्यक सुविधाची पूर्तता केली जाते. पथक गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते. यामुळे ही सर्व स्वच्छतागृहे केवळ शोभेची वस्तू बनून राहतात.
- सोहम डोकडे,
माजी शहर समन्वयक, स्वच्छ अभियान
फोटो - लोहारा शहरातील ग्रामिण रुग्णालयाच्या पाठीमागील सार्वजनिक शौचालयात पाणीसह इतर सुविधा उपलब्ध करताना