फोटो (२३-१) संतोष मगर
तामलवाडी : ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीच्या तडाख्यातून जगविलेली टोमॅटोची शेती कष्टाने पिकवली. मात्र, बाजारात दोन रुपये प्रति किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक चांगलाच अडचणीत आला आहे. तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील मधुकर खोत यांचे टोमॅटो देखील अक्षरश: शेतात कुजत पडले आहेत.
मधुकर खोत यांची केमवाडी शिवारात जमीन असून, त्यांनी ठिबक सिंचनावर सप्टेंबर महिन्यात ४० गुंठे जमिनीत टोमॅटो रोपाची लागवड केली. त्यासाठी त्यानी ६० हजार रुपये खर्च केले. त्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा बसला. टोमॅटोच्या शेतीत पाणी साचून त्यांचे मोठे नुकसान झाले. हा तडाखा सहन करीत त्यांनी या रोपांची जोपासना केली. खते, फवारणी, करून पीक जोमात आले. फळधारणेसही सुरुवात झाली. मात्र, आता बाजारात फळभाज्यांचे भाव ढासळल्याने सोलापूर बाजारपेठेत २ रुपये प्रति किलो भाव मिळू लागला. त्यामुळे उत्पादन खर्चही हाती पडणे मुश्कील झाले आहे. तोडणीसाठी लावलेल्या मजुरांचा खर्च पण पदरात पडेना. पदरमोड करून मजुरी दिली. बाजारात भाव मिळत नसल्याने एक एकरावरील टोमॅटो जाग्यावरच कुजून जाऊ लागले आहेत. भाव ढासळल्याने खोत याचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चौकट...
२० किलो वजनाच्या कॅरेटला ३० रुपये भाडे टेम्पो मालक घेतो. परंतु, बाजारात केवळ दोन रुपये भाव मिळत असून, यातून वाहतूक खर्च व लागवडीचा खर्च देखील पदरात पडत नाही. त्यामुळे टोमॅटोची शेती धोक्यात आली आहे. अखेर त्या शेतीवर रोटा वेटर फिरवावा लागतो आहे. - मधुकर खोत, शेतकरी केमवाडी