उस्मानाबाद : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजने अंतर्गतचा वीस हजार रूपयांचा धनादेश देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेताना उमरगा तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १३ मार्च रोजी रंगेहात पकडले. ही कारवाई संजय गांधी निराधार योजना विभागात करण्यात आली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आत्याच्या नावे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वीस हजार रूपयांचा धनादेश आला होता. हा धनादेश मिळावा, यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी चकरा मारल्या असता, तहसील कार्यालयातील अव्वल कारकुन संजय बबनराव शिंदे यांनी पैशाची मागणी केली. सदरील प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. संबंधित तक्रारीची शहानिशा केली असता, तथ्य आढळून आले. यानंतर १३ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागामध्ये सापळा लावला. यावेळी अव्वल कारकुन संजय शिंदे यास तक्रारदाराकडून दीड हजार रूपये स्विकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १८८ (सुधारणा २०१८) अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस उपाधिक्षक बी. व्ही. गावडे हे करीत आहेत.