परंडा (जि़उस्मानाबाद) : शेती धरणाच्या भूसंपदान क्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्यासाठी बाराशे रुपयांची लाच घेणाऱ्या अनुरेखकावर सोमवारी (दि. २२ ) दुपारी परंड्यात कारवाई करण्यात आली़ एका शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अनुरेखकास रंगेहात ताब्यात घेतले़
तक्रारदार शेतकऱ्याची शेतजमीन ही सीना-कोळेगाव प्रकल्पालगत आहे़ ही जमीन प्रकल्पाच्या भूसंपादन क्षेत्रात येत नसल्याचा दाखला संबंधित शेतकऱ्यास हवा होता़ यासाठी त्याने परंड्यातील प्रकल्पाच्या उपविभागीय कार्यालयात अर्ज केला होता़ मात्र, हा दाखला देण्यासाठी कार्यालयातील अनुरेखक भारत दगडू माळी (वय ५७) याने शेतकऱ्याकडे बाराशे रुपयांची लाच मागितली़ यानंतर शेतकऱ्याने याबाबत उस्मानाबादच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली़ तक्रारीची शहानिशा करुन लाचलुचपतचे पोलीस निरीक्षक विनय बहीर व त्यांच्या पथकाने परंड्यातील कार्यालयातच सोमवारी सापळा रचला़ दुपारी १ वाजून ४० मिनिटाला अनुरेखक माळी याने तक्रारदार शेतकऱ्याकडून बाराशे रुपयांची लाच स्विकारताच या पथकाने माळी यांना रंगेहात ताब्यात घेतले़ याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़