(फोटो - उस्मानाबाद न्यूज २३)
उस्मानाबाद : शहरातील सर्वात जुनी मात्र अनेक वर्षांपासून दुर्गंधी आणि घाणीच्या विळख्यात सापडलेल्या पांढरी स्मशानभूमीचा नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नातून कायापालट झाला आहे. नगरसेवक सुरज साळुंके यांनीही नागरिकांच्या या प्रयत्नांना चांगला हातभार लावला.
शहरातील सर्वात जुनी स्मशानभूमी म्हणून पांढरी स्मशानभूमीचा उल्लेख केला जातो. शहराचा विस्तार झाला. त्यामुळे एरव्ही दूर वाटणाऱ्या कपिलधार स्मशानभूमीकडे अंत्यविधीसाठी गर्दी होऊ लागली. पांढरी स्मशानभूमी परिसरातील नागरिकांकडून झालेले दुर्लक्ष, अस्वच्छता आणि परिसराला आलेले हागणदारीचे रूप त्यामुळे जुन्या शहरातील नागरिकही अंत्यविधीसाठी पांढरीकडे फिरकेनात. वीज, पाणी, रस्ते यांची वाणवा असल्यामुळे आपसूकच स्मशानभूमी घाणीच्या विळख्यात आणि झुडपांच्या साम्राज्याने वेढली गेली. मागील १० वर्षांपासून या स्मशानभूमीची मोठी दुरवस्था झाली होती.
अखेर परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेत काटेरी झुडपे, वाढलेले गवत, अस्ताव्यस्त पडलेले कचऱ्याचे ढीग बाजूला केले. तसेच रंगीबेरंगी फुलझाडे, तुळशी वृंदावन आणि लख्ख रस्ते यामुळे स्मशानभूमीचे रूपांतर स्मृतिवनात झाले आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंत नाही, त्या ठिकाणी काटेरी कुंपण उभारण्यात आले आहे. अंत्यविधी करण्यासाठी बांधण्यात आलेल्या शेडची दुरवस्था झाली होती. त्याचबरोबर स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या खोलीमध्ये जनावरांचा वावर वाढला होता. माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी स्वखर्चातून परिसराला रंगरंगोटी करून स्वच्छता केली आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत मुक्कामी कर्मचारी देखील उपलब्ध झाला आहे. अंत्यविधीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची देखील उपलब्धता या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी केली आहे.
चौकट......
मागील तीन महिन्यांपासून परिसराच्या साफसफाईचे काम सुरू होते. त्याला आता पूर्णत्व आले आहे. दरम्यान, स्मशानभूमीची झालेली दुरवस्था सर्वदूर पोहोचल्याने मागील वर्षभरापासून अंत्यविधीसाठी तिकडे कोणीच फिरकले नाही. त्यामुळे आपली उपजीविका कशी भागणार, असा प्रश्न येथे मुक्कामी असलेले मसनजोगी गंगाधर इरवाडे यांना पडला आहे.
सध्या अन्य ठिकाणी अंत्यविधी करण्याकरिता टेम्पो, गाड्या, चित्ररथ, असा खर्च करावा लागतो. तो सर्वांनाच परवडेल असे नाही. त्यामुळेच नगरसेवक सुरज साळुंके यांच्या मदतीने मागील चार महिन्यांपासून आम्ही हा परिसर स्वच्छ केला आहे. किमान जुन्या शहरातील आणि परिसरातील मयत नागरिकांच्या अंत्यविधीची येथे सोय होईल, असे गंगाधर इरवाडे यांनी सांगितले.